हैदराबाद, 30 जून (हिं.स.) : तेलंगणाच्या राजकारणामधील भाजपचा फायर ब्रांड चेहरा अशी ओळख असलेला टी राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात राजा सिंह यांनी ट्विटर (एक्स) पोस्ट करत माहिती दिलीय. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्याच्या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आपल्या ट्विटर पोस्टमध्ये टी. राजा सिंह म्हणाले की अनेक लोकांचे मौन संमती म्हणून मानले जाऊ नये. मी केवळ माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलत आहे जे आमच्यासोबत विश्वासाने उभे राहिले आहेत आणि जे आज निराश होत आहेत. मुस्लिम बहुल हैदराबादमध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणून टी. राजा सिंह ओळखले जातात. स्वतःच्या बळावर आमदारकीची निवडणूक जिंकणारे उमेदवार असा त्यांचा लौकिक आहे. त्यासोबतच काँग्रेस, भारत राज्य समिती (बीआरएस) आणि असदुद्दीन ओवैसींची ऑल इंडिया इत्तेहादूल मुसलमिन (एआयएमआयएम) या पक्षांशी एकाच वेळी त्यांचे राजकीय शत्रुत्व आहे. त्यामुळे टी. राजा सिंह नुसते आमदार असले तरी राज्यातील मोठे हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची लोकप्रियता आहे.