अहिल्यानगर दि. 23 एप्रिल (हिं.स.) :- काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथे भारतीय नागरिकांवर झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारा असल्याची भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
काश्मीर खोऱ्यातील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, पहेलगाम येथे झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे. यामध्ये निष्पाप 27 भारतीयांचा अतिरेक्यांनी जीव घेतला आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. याबाबत सरकारने ठोस उपाय योजना केल्या पाहिजे. केंद्र सरकारने कलमामध्ये बदल केला. 370 कलम लागू केले यावेळेस सांगितले वेगळे मात्र वस्तूस्थिती वेगळी आहे. अतिरेकी हल्ला आणि देशाची सुरक्षितता याबाबत सरकारने जास्त जागरूक राहण्याची आवश्यकता होती आणि यापुढे राहील अशी भावना व्यक्त करताना पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
अतिरेकी हल्ले हे कलंक – माजी आ डॉ.तांबे
काश्मीर खोरे हे देशाचे नंदनवन आहे. दरवर्षी हजारो पर्यटक तेथे जातात. मात्र जातीय द्वेष पसरवण्यासाठी काही संघटना अतिरेकी हल्ले करतात यातून निरपराध नागरिकांचा बळी जातो. काल काश्मीरमध्ये 27 नागरिकांचा विनाकारण बळी गेल्या असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मानवतेसाठी कलंक असल्याची प्रतिक्रिया जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद, शेतकरी व युवकांच्या गुंजाळवाडी, समनापुर, निमोन व तळेगाव दिघे येथे झालेल्या स्नेहसंवाद मेळाव्यात पहेलगाम येथे मृत पावलेल्या 27 भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.