नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडी आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली. यात शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसले होते. या दृश्यावरून भाजप आणि शिंदे गटाने ठाकरेंवर टीका केली. फोटोंमध्ये ठाकरे सहाव्या-सातव्या रांगेत दिसत होते.
भाजपची टीका
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, भाजपासोबत असताना मातोश्रीवर देशातील मोठे नेते सन्मानाने येत असत. २०१९ मध्ये अमित शाहही मातोश्रीवर आले होते. मात्र, हिंदुत्व आणि विचारधारा सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मान-सन्मान गेला. महाविकास आघाडीत आल्यापासून ना राहुल गांधी, ना सोनिया गांधी मातोश्रीवर गेले. आता मात्र उद्धव ठाकरेच दिल्लीत त्यांना भेटायला जातात. परिणामी, बैठकीत त्यांना शेवटच्या रांगेत बसण्याचा अपमान सहन करावा लागत आहे.
राऊतांचे स्पष्टीकरण
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि समोर प्रेझेंटेशन सुरू होते. पुढे बसल्यास स्क्रीन दिसण्यात अडचण येत होती, त्यामुळे आम्ही मागे गेलो. ही बसायची जागा नसून फक्त पाहण्यासाठी होती. भाजपच्या लोकांनी हा मुद्दा फुगवला आहे.
शिंदे गटाची प्रतिक्रिया
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसन्मान शिकवला, पण उद्धव ठाकरे यांनी तो घेतला नाही. काँग्रेसच्या बैठकीत त्यांना आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवले, तर एका खासदार असलेल्या पक्षांना पुढच्या रांगेत जागा मिळाली.
बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, कनिमोळी, रश्मी ठाकरे, अखिलेश यादव, रामगोपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, डी. राजा यांसह अनेक नेते उपस्थित होते.