ठाणे, 14 सप्टेंबर – पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना देखील मोदी सरकारने पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा ‘खेळ’ सुरू केला आहे. पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकार विरोधात आज ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आंदोलन करत निषेध केला.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ‘माझं कुंकू माझा देश’ राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना चंदनवाडी शाखा येथे केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी ‘शहीदोके सन्मान में, देशभक्त उतरे मैदान मे… क्रिकेट नाही, युद्ध खेळू’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा संतप्त ठाणेकरांनी दिल्या.
शिवसेनेच्या रणरागिणीनी घराघरातून सिंधूर जमा करून पाठवण्यात आले. पहलगाम च्या भ्याड हल्ल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाढवे सह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ अशी घोषणा केली होती. मात्र काही दिवसांतच नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला याचा विसर पडला. देशवासीयांच्या भावनांचा विचार न करता आशिया कपमधील हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली. मोदींना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेने आंदोलन पुकारले.