पुणे, 12 मे (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या १३ मे रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे. निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यात निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे
यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटला असताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लॉगिन करून आपला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org, results.targetpublications.org या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. ऑनलाइन मार्कशीटमध्ये विषयवार गुण, जन्मतारीख आणि रोल नंबर समाविष्ट असेल.