रुक्मिणी मातेच्या माहेरची मानाची प्रथम पालखी
अमरावती, 31 मे (हिं.स.)
कौंडण्यपूर येथे ४५० वर्षांपूर्वी संत सद्गुरू सदाराम महाराज होऊन गेले. त्यांनी १५९४ मध्ये कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी वारी सुरू केली. ती परंपरा आजही सुरू असून पायदळ वारीचे यंदाचे ४३१ वे वर्ष आहे. रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघणारी ही महाराष्ट्रातली पहिली पालखी आहे.
वृद्धापकाळामुळे संत सद्गुरू द्गुरू सदाराम महाराजांना वारी करणे शक्य झाले नाही. त्यावेळी पांडुरंगाचा धावा केला असता पांडुरंगाने स्वतः संत सदाराम महाराजांना दर्शन देऊन मी दरवर्षी आषाढी, कार्तिक पौर्णिमा व प्रतिपदेला कौंडण्यपूरला येईन, असे वचन दिल्याची आख्यायिका आहे. ती परंपरा सुरू आहे. यंदा पालखीचे प्रस्थान शनिवार, ३१ मे रोजी कौंडण्यपूर येथून संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, सचिव सदानंद साधु, वसंत डाहे, सुरेश चौहान, विश्वस्त अशोक पवार, डॉ. रामकृष्ण करडे, सत्यनारायण चांडक, अतुल ठाकरे, हरीश मुंदडा, धनश्री दिवे, शुभांगी काळे, पंकज महाराज महल्ले, व्यवस्थापक कपिल गावंडे व वारकऱ्यांच्या उपस्थितीत रवानाआषाढी एकादशी जवळ येते तशी वारकऱ्यांची पंढरपूर वारीची लगबग सुरू होते.
भूवैकुंठ पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी निरनिराळ्या दिंडीत (पालखीत) सहभागी होतात. सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने कूच करतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, मुक्ताई यांच्या पालख्या तर विदर्भातून संत गजानन महाराज व इतर पालख्या निघतात.कौड्यंन्यपूरयेथील मानाची रुक्मिणी मातेच्या माहेरची पालखी. कौंडण्यपूर हे विदर्भातील अतिपुरातन तीर्थक्षेत्र असून, विदर्भराज भीष्मक राजाची राजधानी होय. रुक्मिणी मातेचे माहेर आहे. तसेच पाच सतीचे माहेर आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेली व पालखी सोहळ्याचा उगम असलेली पालखी अनेक वर्षे दुर्लक्षित होती. आता राज्य शासनाने मनाची पालखी असल्यामुळे अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुक्मिणी मातेच्या पालखीला देखील सर्व सुविधा उपलब्ध – करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्री क्षेत्र कौंडण्यपूरला तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला असून. तीर्थ क्षेत्र अ दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पालखीचा 3 जुलै रोजी पंढरपुरात होणार प्रवेश
पालखीत दररोज भजन, हरिपाठ, कीर्तन होईल. गेली कित्येक वर्षे सेवा करणारी ठिकठिकाणची गावकरी मंडळी उत्साहाने पालखीचे मार्गात स्वागत करतात. ३३ दिवसांच्या दीर्घ प्रवासानंतर दररोज अंदाजे १५ ते २० किमी प्रवास करून अमरावती, कारंजा, वाशीम, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर ह्या जिल्ह्यातून प्रवास करून ३ जुलै रोजी पालखी पंढरपूर प्रवेश करणार आहे. तसेच ३० जून रोजी माढा मुक्कामी रिंगण सोहळा होणार आहे. ३ ते १० जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरला असून 10 जुले रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरु होईल.