खास प्रतिनिधी
सोलापूर : जन्मदाता पिता अन् लेकीच अत्यंत जिवाभावाचं नातं. जणू दुधावरच्या सायीप्रमाणं एकमेकांना जपणारं हे नातं. पण कलियुगात आयुष्याचा जोडीदार स्वत:च्या मर्जीप्रमाणे ठरविण्याच्या लेकींच्या विचारातून या नात्यामध्ये कटुता निर्माण होतेय. ‘लक्ष्मी’च्या पावलांनी घरी आलेल्या लाडक्या लेकीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेला पिता जेव्हा मर्जीतील मुलासोबत लग्न करायला अडसर ठरतो, तेव्हा तो दुष्मन वाटायला लागतो. ज्या पित्याच्या अंगा खाद्यांववर वाढलेल्या ‘तिच्या’ मनात बापाबद्दल घृणा येते, तेव्हा त्याच वळणावर बाप-लेकीमधील अत्यंत प्रेमळ अन् जिव्हाळ्याचं नातं तुटण्याच्या वळणावर येतं. असाच बाप-लेकीमधील नात्यावर कटुतेचे ढग आले होते. पण पुढं घडलं ते वेगळंच अन् अनपेक्षित. पित्याच्या नात्याबद्दल पोटच्या पोरीचं ह्दय पाझरलं.बापाला, तिनं चक्क तुरुंगातून बाहेर काढलं, तिच्या मायेच्या पाण्यानं बापाच्या ‘संतापाला’ कायमचं विझवलं. आंतरजातीय विवाहवरुन दुरावलेल्या नात्यांना पुन्हा बहर येण्याचा टॅ्रक झाला.
दक्षिण काशी पंढरपरपूरच्या न्यायलयात चालेल्या खटल्यासंबंधीची खरीखुरी स्टोरी. मुलीचे बापावर अगाध प्रेम असते. बाप जरी तिच्या जिवावर उठला तरी ते प्रेम तसुभरही कमी होत नसते. त्याचा प्रत्यय आणून देणारी घटना वास्तव घटना. अनिता ( काल्पनिक नाव) ही एका घराण्यातील आई-बापाची तशी लाडकी लेक. आपल्याच समाजमधील पदर लागणार्या घराण्यात लेक द्यावी, तिचं हात पिवळं करुन कन्यादान करावं. मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतुन मोकळं व्हावं हा आई-वडिलांचा विचार. पण या विचारालाच अनिता हिने कोलदांडा लावला. तिच्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न करण्याचा तिने चंग बांधला. तिचा तो मर्जीतील राजकुमार अनिल (काल्पनिक नाव) हा वेगळ्या समाजातील होता. लेक आयुष्यभरासाठी परजातीमधील तरुणाच्या हातात हात देतेय, हा विचार बाप सुभाष (काल्पनिक नाव) यांना न पटलेला. शेवटी अनिता हिने आई-वडिलांचे न ऐकता अनिल याच्यासोबत सप्तपदी चाललेली.
घरच्या मंडळींचा विरोध झुगारून अनिताने बंड करून परजातीच्या अनिलशी प्रेमविवाह केल्यामुळे संतापलेल्या वडिल सुभाष यांनी आपल्या घराण्याची इज्जत गेली म्हणून तिसर्याच दिवशी अनिता आणि जावई अनिल यांचा काटा काढण्याचा डाव रचलेला. मात्र तो अयशस्वी झालेला. त्यानंतर काही दिवसांनी बाप सुभाष हा पिस्तूल घेऊन एका मोटारीतून लेक अनिता आणि जावई अनिल यांना मारण्यासाठी तडक निघाला होता. मात्र, दरम्यान वाटेत रात्री गस्त घालणार्या पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्या मोटारीत बेकायदा पिस्तूल सापडले. बाप सुभाषसह इतर दोघांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेली. तपासादरम्यान पोटच्या मुलीने विरोध झुगारुन केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे घराण्याची अब्रू गेली म्हणून संतापलेल्या बापाने ’सैराट’ होऊन पोटच्या मुलीसह जावयाला खलास करण्याचा डाव रचल्याचे निष्पन्न झाले.
अटकेनंतर बाप सुभाषसह अन्य दोघा साथीदारांनी जामिनावर सुटण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, बाप सुभाष तुरूंगातून सुटून बाहेर आला तर मुलगी अनिता आणि जावई अनिल या दोघांच्याही जीविताला धोका निर्माण होईल, असा आक्षेप सरकार पक्षाने घेतला होता. त्यातून तब्बल दोनवेळा बाप सुभाषचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान या खटल्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा बापाने जामीन अर्ज दाखल केला असता
पण अत्यंत महत्त्वाच्या ट्रॅकवर गरोदर झालेल्या अनिताचं जन्मदात्या पित्याबद्दल मन द्रवले. ह्दय पाझरलं. तिने बापाला माफ करण्याचे मनापासून ठरविले. जावय अनिल यानेदेखील त्याला होकार दिला. त्यासाठी न्यायालयात शपथपत्र दाखल केले.
पिता सुभाष यांना माफ करावे, त्यांच्यापासून मला आणि माझ्या अनिल याच्या जीवितास कोणताही धोका नाही. उलट, मी गरोदर असल्याने पित्याच्या आधाराची खरी गरज आहे. त्यामुळे पित्याला जामिनावर सुटका करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे तिने शपथपत्रात नमूद केले. तब्बल तीन महिन्यांनंतर बापाची तुरुंगातून सुटका झाली. या बहुचर्चित प्रकरणात बाप सुभाष तर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील अॅड. धनंजय माने, अॅड. जयदीप माने, अॅड. सिद्धेश्वर खंडागळे, अॅड. सुहास कदम, अॅड. वैभव सुतार, अॅड. शिवप्रसाद ढोले काम पाहात आहेत.
पित्या-कन्येस या ओळी ठरल्या सार्थ
सिद्धनाथ नगरी पासून सुरु झालेले क्रोधाचे सैराटी वादळ अर्धनारी नटेश्वर नगरीतून पंढरीत आल्यानंतर पूर्णपणे विरून गेले ! लेक बापाला नेहमी म्हणत असते-
‘पाच बोटे अमृताचे, पंचप्राण तुमचे त्यात,
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळ ! ’
खेळ कुणाला दैवाचा कळला?
आंतरजातीय तरुणाशी विवाह केला, घराण्याची सर्वत्र इज्जत, आब्रु धुळीला मिळविली. या संतापाने पिता सुभाष हा पिस्तूलने लेक अनिता आणि जावई अनिल यांना उडवणार होता. मात्र पुढे घडले ते वेगळेच. पण हळव्या लेकीचं मन पघळलं. तिनं बापाला माफ केलं. बापाबद्दल माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, हे सगळ जागं झालं. त्यातून तिनं तुरुंगात सडणार्या बापाला बाहेर काढलं. ‘खेळ कुणाला दैवाचा कळला?’ याचा प्रत्यय या घटनेतून आला.