बागलकोट,24 मे (हिं.स.) : कोणत्याही राज्याने कितीही विरोध केला तरी कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर करण्यावर ठाम असल्याचे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले. बागलकोट जिल्ह्यातील कोल्हार येथे
विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी शिवकुमार म्हणाले की, बेळगाव, विजापूर, बागलकोट व रायचूर जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांना जमिनीबरोबरच मोठ उद्योगधंद्यासाठी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी लवकरच केंद्रीय जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यांची कृष्णा लवादाच्या पाणी वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी कर्नाटकाची बाजू ठामपणे मांडून कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर करण्यासाठी केंद्र शासनावर दबाव टाकणार आहे.
अलमट्टी जलाशयाच्या व्याप्तीत येणाऱ्या व बेळगाव, विजापूर, बागलकोट, रायचूर जिल्ह्यांतील अनेक महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शेतकऱ्यांच्या दोन्ही हंगामांतील पिकाला पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृष्णा भाग जलनिगमच्या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी कर्नाटक शासनाकडून सर्वच अंदाजपत्रकात कोट्यवधी रुपयांचे अनुदान ठेवण्यात आल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.
भाजप सरकार योजना पूर्ण करण्यासाठी अपयश ठरल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर खोटे-नाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन आरोप सिद्ध करून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले. आमच्या सरकारने 2 वर्षे पूर्ण करून सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांना अनेक महत्त्वाकांक्षी योजना देण्याबरोबरच त्यांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कायम प्रयत्नशील आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार असल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
