त्रंबकेश्वर, 13 एप्रिल (हिं.स.)।
निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपिठाचे पिठाधीश्वर श्रीमद जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी (मौनगिरीजी) महाराज यांच्या प्रेरणेने श्रीक्षेत्र अंजनेरी गड (ता.त्र्यंबकेश्वर ) येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ५ एप्रिल पासून सुरू असलेल्या या सोहळ्याची सांगता श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करून भक्तिपूर्ण वातावरणात झाली.
श्री हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा विकास व्हावा साठी येथे जगदगुरु स्वामी शांतीगिरिजी मौनगिरीजी महाराज गेल्या पंचवीस वर्षापासून प्रतिवर्षी जपानुष्ठान,श्रमदान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी आठवडाभर जपानुष्ठान,श्रमदान,अखंड नंदादीप, यज्ञ, हस्तलिखित नाम जप, श्रीराम कथा यांसह भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले. जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजन केले.
पालखी मिरवणूक व संत भंडारा कार्यक्रम सांगतेच्या पूर्वसंध्येला संपन्न झाला. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी जय श्रीराम,जय हनुमान अशा जयघोषात पहाटे ब्रह्म मुहूर्तावर अंजनेरी गड चढून जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी मौनगिरीजी महाराजांच्या हस्ते हनुमान जन्मस्थानावर विधिवत पूजन करण्यात आले. हनुमंतरायाच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा हा संकल्प जय बाबाजी भक्त परिवारांनी केला आहे.त्यामुळे येथे प्रतिवर्षी श्रमदान व जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
दरम्यान जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अंजनेरी गड परिसरात गेल्या आठवड्या भरापासून आयोजित या सोहळ्याची सांगता जय श्रीराम,जय हनुमान,जय बाबाजी अशा प्रचंड जयघोषात भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली.यावेळी जपानुष्ठान साधनेस बसलेल्या साधकांच्या मौन व्रताची सांगता करण्यात आली.संत,अतिथी, ब्राह्मण पूजन यावेळी करण्यात आले. जगदगुरु शांतिगिरीजी महाराज यांनी सदगुरु कार्य व शक्ती,युक्ती,भक्तीचे प्रतीक असलेल्या श्री हनुमान अवतार कार्य यावर मार्गदर्शन केले.महाआरती,सत्संग यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात या सोहळ्याची सांगता करण्यात आली.