पुणे, 5 जुलै (हिं.स.)। शिक्षणाचे माहेरघर असलेले पुण्यात एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला ‘जय गुजरात’चा नारा संतापजनक आणि धक्कादायक होता.सत्ताधारी महायुती सरकार ने गुजरात चे मांडलिकत्व स्वीकारले आहे का? असा सवाल बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी उपस्थित केला.
‘जय गुजरात’चा नारा देणारे शिंदे यांनी राज्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.सत्ताधाऱ्यांनी राजकारणासाठी महाराष्ट्राचे गुजरातीकरण करू नये, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.पुरोगामी विचारांवर मार्गक्रमण करणाऱ्या बसपाचे ‘सर्वजण हिताय, सर्वजण सुखाय’ हेच ब्रीदवाक्य आहे.परंतु, केवळ दिल्लीधिशांना खुश करण्यासाठी मराठी तसेच राज्याचा सांस्कृतिक अस्मितेला सत्ताधाऱ्यांनी तडा दिला आहे, बसपा हे सहन करणार नाही, असे डॉ.चलवादी म्हणाले.
महायुती सरकारने मराठी बांधवांच्या स्वाभिमानाचा खेळखंडोबा केला.राज्यातील सत्ताधारी कुणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत? कुण्याच्या सांगण्यावरून राज्यातील धोरणे निश्चित करीत आहेत? जय गुजरात चा नारा कुणाच्या सन्मानार्थ दिला जात आहे? असे गंभीर प्रश्न डॉ.चलवादी यांनी उपस्थित केले.
सत्ताधाऱ्यांकडे निर्णय घेण्याची ताकद आता उरली नाही, दुसऱ्या राज्यातील नेत्यांच्या कृपेवर ते अवलंबून आहेत.हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला हे साजेस नाही,अशी खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.
नोकऱ्यासह मोठे प्रकल्प गुजरात मध्ये हलवले जात आहेत. एकीकडे यासंदर्भात सत्ताधारी मौन बाळगत आहे, तर दुसरीकडे त्याच राज्याचा जयजयकार केला जातोय. ही राजकीय गुलामगिरी आहे, अशी टिका डॉ.चलवादी यांनी केली.
सत्ताधाऱ्यांची दुटप्पी भूमिका केवळ मराठी अस्मिताच नाही तर राज्यातील असंख्य पीडित,उपेक्षित, वंचित आणि कष्टकऱ्यांच्या आत्मासन्माचा उपहास करणारी आहे. राज्यातील सुशिक्षितांच्या हातातून रोजगार हिरवले जात आहे तर दुसरीकडे सत्ताधारी ‘जय गुजरात’चा नारा देत सत्ताधारी दिल्लीधीश आणि गांधीनगर ला खुश करण्यात मग्न आहेत, अशी खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त करीत सत्ताधाऱ्यांनी राज्याची माफी मागावी, अशी मागणी केली.