नवी दिल्ली, 26 मे (हिं.स.) : राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात कोरोना साथरोगाचे 99 नवे रुग्ण आढळले. दिल्लीत सध्या कोरोनाचे 104 सक्रिय रुग्ण असून देसात एक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आहेत, त्यानंतर महाराष्ट्र 209 आणि दिल्ली 104 एक्टिव्ह रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कर्नाटकात 34 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 47 झाली आहे. गुजरातमध्ये 76 नवीन रुग्ण आढळले आहेत, आता राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 83 झाली आहे. हरियाणामध्ये कोरोनाचे 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 9 झाली आहे. तर राजस्थानमध्ये 11 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत, एक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये 11 नवीन रुग्ण आढळली आहेत. उत्तर प्रदेशात 15 नवीन रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावा असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत दररोज सरासरी 9 जणांना कोरोनाची लागण होत आहे. मुंबईसह देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिलने (आयएमए) कोरोनाला घाबरू नका, पण सतर्क राहा असं म्हटलं आहे. “कोरोना व्हायरस पुन्हा परत येत आहे, परंतु त्याचा प्रभाव 2020 किंवा 2021 सारखा नाही. कोरोना आता येत राहील, म्हणजेच दर काही महिन्यांनी त्याचं नवीन रुप दिसू शकतं” असं आयएमए कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव विजयदेवन यांनी सांगितले
