अमरावती, 29 जुलै – महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि जैवविविधतेने समृद्ध असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना दिसत आहे. प्रकल्पात सध्या १५० वाघांचे वास्तव्य असून ही संख्या राज्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
वाघांची आकडेवारी अशी:
-
नर वाघ – २५
-
मादी वाघ – ४७
-
दोन वर्षांपर्यंतचे शावक – ७८
-
तरुण वाघ (वर्गवारीबाहेरचे) – २७
वन विभागाच्या मते, संरक्षण उपाय, टेहळणी यंत्रणा, ड्रोनद्वारे निरीक्षण, वॉच टॉवर्स, आणि स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग यामुळे वाघांच्या मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे, २०२४–२५ या कालावधीत केवळ एका वाघाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका कमी करण्यासाठी स्थानिक आदिवासी व गावकऱ्यांना रोजगार, शिक्षण व आरोग्य सुविधा पुरवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मानव आणि वाघ यांच्यातील सहअस्तित्वाचा आदर्श मेळघाटने निर्माण केला आहे.
डॉ. जयंत वडतकर (वन्यजीव अभ्यासक) यांनी सांगितले की, “वाघांची वाढती संख्या ही केवळ यशाचीच नव्हे, तर पर्यावरण आणि विकास यामधील संतुलन टिकवून ठेवण्याचे उत्तम उदाहरण आहे. हीच कामगिरी कायम राहिल्यास महाराष्ट्र व्याघ्र संवर्धनात देशात आघाडीवर असेल.”
मेळघाट केवळ वाघांचे निवासस्थान नाही, तर येथे बिबटे, अस्वले, सांबरे, चौशिंगा, गवा यांसारख्या अनेक प्रजाती आढळतात, ज्यामुळे प्रकल्प क्षेत्र जैवविविधतेचा सुरक्षित अधिवास बनला आहे.