पुणे, 26 मे, (हिं.स.)। राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. मुंबई ३५, पुणे ७, पुणे ग्रामीण – १ अशा एकूण नवीन ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या २४८ पर्यंत पोहोचली आहे. हे सर्व निदान झालेले रुग्ण असून सौम्य स्वरूपाचे आहेत.
मात्र, खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून त्यांनी विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. राज्यातील इतर जिल्ह्यांत रविवारी एकही रुग्ण आढळलेला नाही.
जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ७ हजार ३८९ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ३०० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात केवळ मुंबई विभागात एकूण २४८ रुग्ण सापडले आहेत. तर, आतापर्यंत ८७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.