नातेप्रिय लोक ‘हे’ म्हणताहेत, आठ मुलीचं माञ रुटीन सुरु, कुछ भी गम नहीं !
शिवाजी भोसले
सोलापूर : तब्बल आठ मुली, सख्खा भाऊ, डझनावरी नातसुना आणि नातवंडे असा मोठा गोतवाळ असतानादेखील भिमाआज्जीला जिवंतपणी कोणीच सांभाळले नाही, हे तर बाजूला राहू द्या, पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कारासह अस्थीला हात लावायला कोणी पुढं आलं नाही, हे अत्यंत ह्दयद्रावक आणि धक्कादायक वास्तव सर्वात प्रथम दैनिक ‘सुराज्य’नं छापून चव्हाट्यावर आणलं. भिमा आज्जीच्या ह्दयद्रावक करुण कहाणीनं अक्षरश: जग अजूनही हळहळतयं. इतकेच काय तर समाजमनदेखील चिंतामग्न झालं. निष्ठुरपणाच्या वागण्यातून एखाद्यावर इतकी दूर्देवी वेळ यावी तर कशी? रक्तामासाचं, हाडामासाचं नातं बाजूला सारा, पण एक हाडामासाचा जीव म्हणून तर कोणी पुढं यावं, मानवतेला पाझर फुटू द्यावा, असंसुद्धा घडलं नाही, याबद्दल समाजमनातून अत्यंत आश्चर्य व्यक्त केलं गेलं. भिमा आज्जीच्या करुण कहाणीचा चर्चा अजूनही संपता संपेना हे वास्तव आहे.
दरम्यान, भिमा आज्जीच्या संदर्भात जे झालं त्याबद्दल समाजामधील नातेप्रिय आणि सुज्ञ नागरिकांनी दैनिक ‘सुराज्य’सह सोशल मीडियावर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्या आठही मुली आणि बहिणीच्या पाठीवर पाय ठेऊन आलेला भाऊ यापैकी कोणालाच भिमा आज्जी कळली नाही. ज्या सख्या भावाला आपल्या सख्या बहिणीचं नातं कळलं नाही, त्याशिवाय जिच्या उदरातून जन्म घेतला, जिनं हे जग दाखविलं, लहानाचं मोठं केलं, लग्न लावूनदेऊन आयुष्य मार्गी लावलं अशा आईला ज्यांनी आपलं मानलं नाही. मरताना पाणी पाजलं नाही, तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत, जिच्या अस्थिंना स्पर्श केला नाही, त्या आठही मुलींच्या घरावर समाजाने बहिष्कार घालायला हवा, भिमा आज्जीच्या संबंधित आठ मुली आणि तिचा सख्या भाऊ यांच्या घरी समाजामधील कोणीच मुली देऊ नये, सोयरीक करु नये, अशाही अनेकांच्या प्रतिक्रिया राहिल्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे आईसोबत, बहिणीबरोबर नातेसंबंध जपायला आले नाहीत, त्या मुली किंवा तो पाषाणह्दयी भाऊ यांच्या घरी दिलेल्या मुलींना हे निष्ठुर लोक किती माया, ममता, वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दाखविणार? असा मुद्दादेखील अनेक नातेप्रिय लोकांनी ‘सुराज्य’कडे उपस्थित केला.
थोरली बहिण मिराबाईनेच ताटातुट केल्याचा आरोप स्वत:च्या आईला आठही बहिणींनी बहिष्कृत का केलं? तिच्या अंत्यसंस्कारासह अस्थिलाही स्पर्श केला नाही, या प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी मृत भिमा आज्जीच्या काही मुलींना संपर्क साधून माहिती घेतली असता, थोरली बहिण मिराबाई काकडे (रा.ढोकबाभुळगाव ता. मोहोळ) यानी सर्वांची ताटातुट केली, असा आरोप काही बहिणींनी केला. आईला आश्रमात नेवून ठेवण्याचे कटकारस्थान तिनेच केले, असाही त्यांचा आरोप आहे.
आठ बहिणी…पण जिव्हाळ्याचं एकीबरोबरदेखील नाही नातं भिमा आज्जीला आठ मुली आहेत. मात्र या आठ बहिणींपैकी कोणाचेच कोणासोबत जमत नाही. कोणामध्ये तेवढे जिव्हाळ्याचे संबंध नाहीत. काही बहिणींमध्ये तर बोलण तर सोडाच पण साधं तोंड बघणंदेखील नाही, अशी माहिती मिळाली. जावाई धोडिंबा काकडेंनी दडवली माहिती वयोवृद्ध भिमा आज्जीला त्यांची सर्वात मोठी मुलगी मिराबाई धोडिंबा काकडे यांनी मोरवंचीच्या आश्रमात सन 2023 मध्ये आणून सोडले होते.दरम्यान भिमा आज्जीला मिळालेल्या वागणूकीबद्दल त्यांच्याकडून माहिती घेण्याचा दैनिक ‘सुराज्य’ने प्रयत्न केला. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती विचारली असता त्याचे पती धोडिंबा यांनी ‘म्हातारीच तापट होती’ एवढीच त्रोटक माहिती दिली. जादा बोलणे टाळत मी पुन्हा फोन करतो म्हणून सांगत माहिती देणे टाळले.
कोणी संभाळायचं? यावरुनच भिमा आज्जीचे मृत्यूनंतरदेखीलसुद्धा हाल साधारण 25 वर्षांपूर्वी भिमा आज्जीचे पती नागनाथ यांचे निधन झालं. तेव्हापासून सांभाळण्यावरुन भिमाबाईंचे हाल सुरु झाले. सुरवातील काही वर्षे आशा व्यवहारे (रा.मुंढेवाडी ता. मोहोळ), शोभा चव्हाण (वडवळ ता. मोहोळ) आणि मिराबाई काकडे (रा.ढोकबाभूळगाव ता. मोहोळ) या तिघी मुलींनी आई भिमाबाईंना सांभाळले. त्यानंतर मात्र वयोवृद्ध झालेल्या शिवाय डोळ्याला दिसत नसलेल्या आणि कानाने बहिर्या झालेल्या भिमा आईला कोणी सांभाळायचं? हा मुद्दा झाला. सांभाळण्यावरुन बहिणींमध्ये कोणाचेच एकमत झाले नाही. भावानेदेखील बहिणीला सांभाळण्याचा विषय डोक्यात घेतला नाही. यातून भिजा आज्जीला जीवंतपणी सांभाळणं तर सोडाच,पण तिच्या अंत्यसंस्कारला कोणी पुढं आलं नाही. तिच्या अस्थींना कोणी स्पर्श केला नाही.
आश्रमात भिमा आज्जी सांगायच्या आपल्या मुलींबद्दल…
प्रार्थना फांऊडेशनच्या मोरवंची (ता. मोहोळ) च्या आश्रमात भिमा आजी मृत्यूपूर्वी वास्तव्याला होत्या. यादरम्यान त्या मुली, भाऊ, जावई, नातवंडे यांच्याबद्दल खूप काही सांगायच्या.मिराबाई काकडे (ढोकबाभूळगाव), शोभा चव्हाण ( वडवळ), निर्मलाबाई पवार (नान्नज), लक्ष्मीबाई चव्हाण( खुनेश्वर),जयश्री गवळी (शिरापूर मो), आशा व्यवहारे (मुंढेवाडी) उषा आतकरे(देगाव ता. मोहोळ), शेषा थिटे ( पीरटाकळी ता. मोहोळ) आणि सख्या भाऊ दादा साठे ( शिरापूर मो) असा मोठा भाऊ, नातवंडे, नातसुना असा मोठा नातेवाईकांचा गोतवळा आपल्याला असल्याचे भिमा आज्जी नातेवाईकांचा विषय निघाल्यानंतर सांगायच्या.
काही हायलाईटस्…
: आईच्या मृत्यूनंतर तिला पाहण्यासाठी आश्रमात
आलेल्या आठही मुलींनी सुरवातीला केलं रडारडचं नाटक
: आपणच का जबाबादी घ्यावी, आहेत ना अजून सगळे,
याच मुद्यावर तटून राहिल्याने नातेवाईकांशिवाय झाले अंत्यसंस्कार
: जिवंतपणी भोग भोगणार्या भिमा आज्जीकडं डुकुंनही न पाहिला
आजीच्या चुलत भावाचा मुलगा म्हणतोय मी दहावा घालू का?
: भिमा आज्जीची मुंढेवाडीची आशा व्यवहारे ही मुलगी म्हणाली,
आई-वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे काय झाले नाही माहित
चौकट
नियतीचा फेरा अन् कर्मगती फिरणार
आठ मुली अन् भावाचा हिशोब चुकता होणारच!
भिमा आजीच्या करुण कहाणीवर सोशल मीडियावर अनेक नेटकरी बोलते झाले. ज्या मुलींनी आपल्या आईबद्दल इतकी निष्ठुरता दाखविली,सख्या भावानंदेखील त्याचीच री ओढली. कसाईसुद्धा इतकं निष्ठरुपणे वागत नाही, असे सगळे भिमा आज्जीबद्दल वागले. त्याचा हिशोब चुकता होणारच. नियतीचा फेरा येतोच, कर्मगती फिरणार, पोटच्या आठ मुली आणि सख्या भाऊ यांना शिक्षा मिळणारच.या आणि अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकर्यांनी व्यक्त केल्या.