कोल्हापूर, 6 मे (हिं.स.)।
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यांच्या हस्ते माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून जयसिंगपूर नगरपरिषदेंतर्गत ७.५ कोटी रुपयांच्या निधीतून तयार केलेल्या ‘शिवतीर्थ’ या भव्य वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १४ फुट उंच, ३.५० टन वजनाच्या आणि ब्रांझ धातूचा वापर केलेल्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जयसिंगपूर शहरासाठी आवश्यक निधी त्या त्या वेळी दिला आणि एक आदर्श शहर आज निर्माण झाले आहे. दोन हजार कोटी रुपयांची कामे तालुक्यात सुरू आहेत. येत्या काळात पुढील विकासकामांना प्राधान्य देत आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन फक्त पुतळा नाही उभारला तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच ठिकाणी अभ्यासिका सुरू केली. मुलांना प्रेरणा मिळावी, लोकांना इतिहास कळवा म्हणून ऐतिहासिक संग्रालय सुद्धा सुरू केले.
जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात शिवतीर्थ परिसर उभारण्यासाठी काम केलेल्या विविध पुरवठादारांचे आणि तालुक्यातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तरुणांचा सन्मान करण्यात आला.
आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रास्ताविक करून विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी १९१६ साली स्थापन केलेल्या जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे, वस्तू संग्रालय व ग्रंथालय बांधकाम करणेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपरिषदेस शासनाकडून मोफत जागा दिलेली आहे. तसेच शिवतीर्थ बांधणे कामासाठी रक्कम रुपये ७ कोटी ५० लक्ष इतका निधी मंजूर केला. शिवतीर्थ वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संग्रालयात इतिहासकालीन शस्त्र व दुर्मिळ पत्रव्यवहार लोकांना पाहणेसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय ग्रंथालयाचे बांधकाम पुर्ण झाले असल्याने शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची तयारी करणेच्या दृष्टीने समृद्ध पुस्तकांचे भांडार उपलब्ध होणार आहे. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि शिवरायांची प्रतिमा भेट देवून केले.
गडकोट किल्ल्यांचे संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेत, त्यांचे आदर्श विचार लोकांच्या मध्ये रुजवण्यासाठी राज्य शासनाकडून शिव जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नुकतेच महाराष्ट्रातील बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को मार्फत घोषित झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान असून महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांचे संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.