सोलापूर प्रतिनिधी
अनेक दिवसापासून बंद असलेली सोलापूरची विमान सेवा सुरू होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेड च्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सायंकाळी होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकचे विमाने उडवून सरकारची व लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवून निषेध केला.
सोलापूर विमानतळ होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळी आंदोलने करण्यात आली होती, तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही. गेल्या सहा महिन्यापूर्वी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय नेत्यांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही.
विमान सेवा ही सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, त्यामुळे सोलापुरातील नागरिक विमानसेवा सुरू केव्हा होईल, याकडे आशा ठेऊन आहेत, त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकात्मक विमान उडवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, जयश्री जाधव, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, उपाध्यक्ष सतीश वावरे, शहर संघटक सिद्धाराम स्वबळे, शहर संघटक शेखर कंटेकर, दिलीप निंबाळकर, विरेश कंटीकर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, शहर सचिव रमेश भंडारे, विशाल सोलापूर आदी उपस्थित होते.