चेन्नई, 11 ऑगस्ट –
तिरुअनंतपुरमहून दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या एआय 2455 विमानाचे रविवारी रात्री चेन्नई विमानतळावर तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
विमानातील काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, पहिल्या प्रयत्नात लँडिंग करताना धावपट्टीवर दुसरे विमान असल्याने पायलटने पुन्हा विमान हवेत नेले आणि दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग केले. त्यांच्या मते, हा प्रसंग विमान अपघाताच्या अत्यंत जवळचा होता. मात्र एअर इंडियाने समोर दुसरे विमान असल्याचे नाकारले आहे.
एअर ट्रॅफिक ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटरडार24 नुसार, विमानाने रात्री 8:17 वाजता उड्डाण केले होते आणि 10:45 वाजता दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते. एअर इंडियाने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सांगितले की, तांत्रिक अडचण आणि हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईकडे वळविण्यात आले. पहिल्या प्रयत्नात चेन्नई एअर ट्रॅफिक कंट्रोलने ‘गोअराउंड’चे निर्देश दिले, परंतु ते इतर विमानामुळे नव्हते.