प्रतिनिधी
सोलापूर :
कुर्डुवाडी जवळच्या लऊळ गावातील साधारण 50 ते 60 तरुण या चक्रीसह अन्य ऑनलाईन जुगार गेमध्ये फसले आहेत. या तरुणांनी प्रत्येकी या खेळावर साधारण 15 ते 20 लाखांहून अधिक पैसे घालवले आहेत. प्रत्येकी 15 लाखांचा हिशोब धरला तरी 9 कोटी रुपयांना या गावचे तरुण मातीत गेले. तर दुसरीकडे हा जुगार चालविणार्यांच्या खिशात एवढा आकडा आला. तसं तर हा आकडा 9 कोटींपेक्षा अधिक असू शकतो. एकट्या लऊळमधील तरुणांचा जुगारात गेलेल्या पैशांचा आकडा एवढा असू शकतो तर कुर्डुवाडीसह अन्य गावातील तरुणांनी या जुगावर ओतलेला पैशांचा आकडा हा कोटीत धरायचा की अब्बाजवधीत असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तरुणालाई नागवण्याचा आकडा नक्कीच डोळे फिरविणारा असू शकतो.जुगार खेळणार्यांनी लावलेल्या पैशांवर सुरुवातीला पैसे सोडायचे, त्यानंतर तरुणाईला पैसे मिळण्याचे आमिष लागते, पुन्हा त्यांना या मोहजाळातून सुटूच द्यायचे नाही, नुसता पैसा ओढत राहायचा, अशी हा जुगार चालविणार्यांची ट्रॅजिडी आहे.
विशेष म्हणजे गेलेले पैसे कव्हर होतीत होतील, या आशेवर दिवस-रात्र व्हिडीओ जुगार खेळताना संबंधित तरुणांनी जेथून कोठून पैसे उपलब्ध होतील, असं एकही ठिकाण सोडलं नाही.यामध्ये घरदार, जमिनी, जागा,पशुधन, सोनंनाणं, वाहनं असं सगळं सगळं तर विकलंचं विकलं.पण सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजदाराने पैसे काढून तेदेखील जुगारात घालवले. होत्याचं नव्हतं झालं. सगळं सगळं काही संपलं. उद्धवस्त झालं. तरुणाई अक्षरश: भिकेकंगाल झाली. पोटाला महाग झाली.
दरम्यान, चक्रीसह अन्य ऑनलाईन जुगाराच्या मोहजाळात न पडता तरुणांनी सावध होण्याची खरी गरज आहे. लऊळसह कुर्डुवाडी परिसरातून ज्या तरुणांच्या कहाण्या पुढे आल्या आहेत, त्यातून बोध घेणं गरजेचे आहे. मोबाईलमधील ऑनलाईन जुगारात बरबाद झालेल्या तरुणांकडून आता सांगण्यात येतंय की, पैसे येतात हा सगळा काही भूलभूलैय्या आहे. अशा प्रकाराच्या जुगारातून पैसे अजिबात येत नाहीत. एजंटांकडून पैसे आता ओढून घेतला जातोय.
आब्रुमुळे बोलायचं तरी कसं?
तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणं आलं नशिबी
घरदार जागा जमीन, पैसा आडका, सोनंनाणं, पशुधन हे सगळं सगळं गेले. हे सगळं झालं तरी खरं. पण आता बोलायचं तरी कसं? आब्रुमुळे गप्प बसण्याची पर्यायाने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची पाळी चक्री जुगार खेळणार्या बहाद्दरांवर आली आहे.
अवैध व्याजबट्ट्याचा धंदा जोमात,
जुगारवाली तरुणाई अक्षरश: कोमात
मोबाईलद्वारे ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी कुर्डुवाडीसह परिसरातील तरुण खासगी सावकारांकडून 5 ते 10 टक्के दराने पैसे घेत आहेत. त्यातून बेकायदा व्याजबट्याचा धंदात जोमात चालत आहे. मात्र जुगाराच्या दलदलीत अडकलेल्या तरुणांचा पैसा तर गेलाच पण सावकरांच्या तगाद्याने त्यांच्या अक्षरश: कोमात जायची पाळी आली आहे.
एजंट खात्यावर सोडाताहेत पैसे
चक्रीसह अन्य ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी पहिल्यांदा हे तरुण संबंधित एजंटाच्या नावे ऑनलाईन किंवा रोख स्वरुपात पैसे देत आहेत, त्यानंतर हे संबंधित एजंट त्यांना पैसे लावण्यासाठी देत राहायचे.हे पैसे घेऊन जाण्यासाठी ते जुगार खेळणार्यांकडे स्वत: यायचे.
दूधाच्या पगारी जुगारात
कुर्डुवाडी परिसरात संकरित गाई पालनाचा शेतीपुरक चांगला व्यावसाय आहे. दूधाचे चांगले पैसे दहा दिवसाला हा व्यावसाय करणार्यांच्या हाती येत आहेत, मात्र अनेकांना ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागला आहे, त्यामध्ये दूधाच्या पगारी जात आहेत. गाईंचं खाजं आणि औषधोपचार यासाठी शिवाय घरी पैसे देणे गाईंच्या पगारातून शक्य होईना, सगळा पगार जुगारावच जात असल्याची माहिती समोर येत आहे.
मागील दोन वर्षांपासून चक्री जुगार खेळत राहिलो. त्यातून बरबाद झालो. जमीन, पशुधन, टॅक्टर, सोनं हे सगळं गेलं. गेलेले पैसे परत येतील, या आशेवर खेळत राहिलो. पण काहीच पैसे आले नाहीत. पैसे येतात असं केवळ आमिष दाखवलं जातं. पण तसं नाही, सगळा भूलभूलैया आहे. शुद्द फसवणूक आहे. तरुणांनी हा खेळ खेळून बरबाद होऊ नये,
: चक्री ऑनलाईन जुगारात फसलेला तरुण, लऊळ, ता. माढा