महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची माहितप्राणी संग्रहालयासाठी 15 कोटीचा प्रस्ताव डीपीसीकडे पाठविला
सोलापूर : सोलापूर शहराला सध्या चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्यासाठी दोन सल्लागार संस्थेने संमती दर्शवली आहे. या सल्लागार संस्थेची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. विजापूर रोडवरील पाणी संग्रहालयासाठी 15 कोटीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
सोलापूर शहराला सध्या चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या तक्रारी येतात. यासाठी काही दिवसापूर्वी पाणीपुरवठ्यातील तज्ञ अधिकारी आणि सल्लागार संस्था (एजन्सी) यांची बैठक घेतली होती. त्यांच्या काही सूचना आल्या आहेत. दरम्यान, दोन सल्लागार संस्था (एजन्सी) यासाठी सकारात्मक आहेत. नागपूर येथील डी आर. ए. कन्सल्टन्सी, सांगली येथील अमोल मवठे या दोन सल्लागार संस्था निश्चित करण्यात येणार आहेत. वर्क ऑर्डर मंजुरीचा प्रस्ताव आहे. पंधरा दिवसात त्यांना वर्क ऑर्डर देण्यात येईल.
त्यानंतर या सल्लागार संस्था शहरातील अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेचा अभ्यास करणार आहे त्यानंतर आवश्यक ते सादरीकरण करणार आहेत. सादरीकरणास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात पंधरा दिवसांनी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या सल्लागार संस्था शहरातील दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करणार आहेत. दरम्यान, विजापूर रोडवरील प्राणी संग्रहालयाची मान्यता पुन्हा मिळविण्यासाठी सुमारे 35 त्रुटींची पूर्तता करावयाची आहे. त्यापैकी बहुतांश त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे. उर्वरित पूर्तता करण्यासाठी सुमारे 15 कोटीचा निधी आवश्यक आहे. या 15 कोटीच्या निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे महापालिकेने प्रस्ताव पाठविला आहे. त्याचबरोबर सीएसआर फंड मिळविण्याचा प्रयत्न आहे. रिलायन्स कंपनी, एनटीपीसी आणि इतर काही बँकांकडून सीएसआर फंडातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
15 एप्रिल नंतर शहर विकास
आराखडा संदर्भात सुनावणी
सोलापूर शहर विकास आराखडा संदर्भात नागरिकाच्या सूचना हरकती प्राप्त झालेल्या आहेत. त्याची सुनावणी घेण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीकडून येथे 15 एप्रिल पासून सूचना व हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
दुहेरी जलवाहिनीची लवकरच चाचणी
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे मक्तेदाराला सांगण्यात आले आहे. त्यानंतर दुहेरी जलवाहिनीची चाचणी करण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठीच्या पाकणी येथील जागे संदर्भात प्रक्रिया सुरू आहे, असेही महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
—–