रायगड, 16 ऑगस्ट – पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी चार फाटा परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. लोखंडी रॉड व फायटरने केलेल्या हल्ल्यात कुडेकर यांना गंभीर दुखापत झाली होती.
या घटनेनंतर पत्रकार संघटना व विविध राजकीय पक्षांनी तीव्र निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कर्जत पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील शोधमोहिमेद्वारे आरोपींचा शोध घेतला. अखेर कर्जत व महाड परिसरातून महेंद्र घारे, साहिल पवार आणि महेश मोरे या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र 15 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर झाला.
या गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल आणि एक मारुती वॅगनआर कार पोलिसांनी जप्त केली आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे आणि पथकाने केला. अद्याप चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणामुळे कर्जत तालुक्यात पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी लवकरच उर्वरित आरोपींना अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.