:देगाव-बेलाटी रस्त्यावर दुपारी अपघाताचा थरार
: सोलापूर परिसरात खळबळ, बघ्यांची तोबा गर्दी
: शाळेच्या ज्या बसने तो घरी येत होता,
त्याच बसमधून पडून त्याचा झाला मृत्यू
: अपघातादरम्यान बसमधून पडल्यानंतर
अवघ्या काही मिनीटातच बालकाचा करुण अंत
: मृत्यूला जबाबदार असणार्यांवर जोपर्यंत
गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्यावरुन तणाव
खास प्रतिनिधी
सोलापूर : मंगळवार (ता.8)… वेळ साधारण 12 वाजण्याची…सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर सोलापूर नजिकच्या देगाव-बेलाटी रस्त्यावरुन संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळा, कवठे शाळेची स्कूल बस सुसाट वेगाने निघालेली…बसमध्ये पोरांची नेहमीप्रमाणे दंगा मस्ती चालेली…पोरं दररोज दंगा मस्त करतात म्हणून बसमधील शिपायाने दूर्लक्ष केलेलं…चालक बस सुसाट चालविण्याच्या नादात…तोच कोणाला काही कळायच्या आत एक बालक बसमधील दरवाजातून थेट खाली पडतो…पुढच्या क्षणी त्याच्या डोक्यावरुन बसची चाके जातात…डोकं अक्षरश: चेंदामेंदा होऊन धडावेगळं होतं…तोपर्यंत चालकाच्या काहीच लक्षात येत नाही…. आपला मित्र बसमधून खाली पडल्याचे लक्षात येताच, गाडीतील मुलं एकदम गलका करतात…बसमधील शिपायाच्या प्रकार ध्यानातच येताच तो गाडी चालकास बस थांबविण्याविषयी ओरडतो… पुढच्या काही सेंकदात गिअर कमी करुन कचाकच ब्रेकं दाबत चालक गाडी कंट्रोल करुन थांबवतो…तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालंलं असतं…बालकाचा करुण अंत झालेला असतो…घटनेच्या ठिकाणी तोबा गर्दी जमते…नंतरच्या काही वेळात मृतदेह सिव्हीलमध्ये पोस्टमार्टम करण्यासाठी नेला जातो…स्कूल बसमधून पडून बालकाचा करुण अंत झाल्याची घटना वार्याच्या वेगाने सर्वत्र पसरते…मृत बालकाच्या घरच्यासह सगळ्या नातेवाईक, शिंदे सेनेचे पदाधिकारी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये धाव घेतात…मग इथं सुरु होतो मृतदेह ताब्यात न घेण्यावरुन गोंधळ, राडा आणि तणावाची परिस्थिती..!
देगाव-बेलाटी रस्त्यावर ही भयानक घटना मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. कवठे येथील संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थी अनुराग तिमण्णा राठोड (वय13) या बालकाचा शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना याच शाळेच्या बसमधून पडून दूर्देवी अंत झाला. अपघात स्थळी तोबा गर्दी झाली होती. शिवाय सिव्हील हॉस्पीटलमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती. मृतदेह पोस्टमार्टमला पाठवण्यापूर्वी सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथील पोलीस घटनास्थळी पोचले. अपघातास कारणीभूत असलेली स्कूल बस त्यांनी ताब्यात घेतली. ती बस सलगरवस्ती पोलीस ठाण्यात लावली. घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांची तपासाची सुत्रे वेगाने हालवली.
क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी बसमध्ये
असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा
अपघात ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही सजग नागरिकांसह शिंदे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी बसमध्ये आत जाऊन परिस्थिती पाहिली तेव्हा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसमध्ये कोंबलेले दिसले. सुरक्षेच्या अनुषंगाने, कीट वगैरे बसमध्ये काहीच आढळून आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी हा दावा केला.
दोषींना अटक होत नाही, तोपर्यंत
मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
अनुराग राठोड या बालकाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. येथे गावचे नागरिक व मृताचे नातेवाईक यांची गर्दी होती. जोपर्यंत संबधित स्कूल बस चालक, बसमधील शिपाई आणि शाळा संस्था चालकांवर मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल होत नाही, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संबंधितांचा आग्रह होता.
बसचा दरवाजा उघडा ठेवल्यानेच
बालकाचा करुण अंत झाल्याचा आरोप
शाळा सुटल्यानंतर स्कूल बस बेलाटीहून बसवेश्वर नगर येथे मुलांना घेऊन येत होती. चालत्या गाडीदरम्यान बसचा दरवाजा लावलेला नव्हता. दरवाजा लावण्याची काळजी बसमधील शिपाई तथा वाहक याने घेतली नाही, त्यामुळे अनुराग हा खाली पडला. बसचा दरवाजा लावलेला असता तर तो सहाजीकच खाली पडला नसता, पुढील अनर्थ पूर्णपणे टळला असता असा आरोप मृत अनुरागच्या नातेवाईकांनी केला.
अनुरागने गाडीतून स्वत: उडी घेतली,
संस्था चालकाचा मृत्यूशी संबंध कसा?
चालू स्कूल बसमध्ये मस्ती करता करता अनुराग राठोड याने स्वत:हून उडी मारल्याची वस्तुस्थिती आहे. वास्तविक त्याच्या मृत्यूशी शाळा किंवा संस्था चालकाचा थेट संबंध कसा येतो? असा मुद्दा शाळा, संस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आला. या घटनेसंदर्भात दुसरी बाजू ही असली तरी स्कूल बसचा दरवाजा का बंद केला नाही, बसमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच साधने न ठेवता हलगर्जीपणा का केला, हा मुद्दादेखील महत्वाचा उपस्थित केला गेला आहे.
स्कूल बसच्या फिटनेसप्रकरणी केवळ कारवाईचा फार्स;
पोलीस अन् आरटीओ अनुरागसारखे आणखी किती घेणार बळी?
साधारण 2024 मध्ये मे महिन्यात आणि जून महिन्याच्या सुरवातीस स्कूल बसच्या फिटनेसप्रकरणी आरटीओ कार्यालयाने कारवाईची मोहीम राबवली होती.काही अनफिट गाड्यांवर कारवाईदेखील केली होती. पुढे कुठे माशी शिंकली माहिती नाही. अनफिटच्या स्कूल बस शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत सुसाट धावत राहिल्या. स्कूलमध्ये क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी अक्षरश: शेळ्या-मेंढ्याप्रमाणे कोंबण्याचा जीवघेणा प्रकार थांबवावा, या पालक तसेच सामाजिक संस्था, संघटनांच्या मागणीला आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस यांनी जुमानले नाही. स्कूल बसच्या फिटनेसप्रकरणी केवळ कारवाईचा फार्स केला. अशातच अनुराग राठोड या बालकाचा करुण अंत झाला. स्कूल बसमधील नियमबाह्य प्रवास सेवेचा मुद्दा ऐरणीवर आला. पोलीस अन् आरटीओ अनुरागसारखे आणखी किती घेणार बळी?
रात्री अत्यंसंस्कार,
बुधवारी होईल गुन्हा दाखल
पोस्टमार्टम झाल्यानंतर अनुराग राठोड याचा मृतदेह नातेवाईकांना मंगळवारी सायंकाळनंतर ताब्यात देण्यात आला. रात्री उशीरा त्याच्या मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आले. बुधवारी (ता.9) अपघात प्रकरणी अनुराग याचे वडिल फिर्याद देणार असल्याचे सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
:::::::::::::::