पुणे, 28 जुलै – “कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असते. योग्य वेळी सत्य समोर येईल,” अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियाच्या एक्स (पूर्वी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून आपली भूमिका स्पष्ट केली.
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू हॉटेलवर 27 जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकून रोहिणी खडसे यांचे पती व एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 6 जणांना अटक केली. या पार्टीमध्ये अंमली पदार्थ आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
प्रांजल खेवलकर आणि अन्य संशयितांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 26 जुलैच्या रात्री सुरू झालेली पार्टी 27 जुलैच्या पहाटेपर्यंत चालली होती. त्याआधी 25 जुलैलाही अशाच प्रकारची एक पार्टी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसांसाठी संबंधित फ्लॅट बुक केल्याने, पोलिसांनी 25 जुलैच्या पार्टीसंदर्भात आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
या प्रकरणावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले, “जर ती खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि आमचे जावई दोषी असतील, तर मी त्यांच्या वागणुकीचे समर्थन करणार नाही. मात्र, पोलीस यंत्रणेने पारदर्शक आणि निष्पक्ष तपास करावा. जर कोणाला जबरदस्तीने अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर आम्ही त्याचा विरोध करू.”