अमरावती, 6 सप्टेंबर।
खग्रास चंद्रग्रहण उद्या ७ सप्टेंबर २०२५ रोजी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे चंद्रग्रहण रात्री ९ वाजून ५७ मिनिटे ते १ वाजून २७ मिनिटांपर्यंत दिसेल.
चंद्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो. सूर्य, पृथ्वी, चंद्र या तिन्ही गोलांचे मध्य एका सरळ रेषेत आणि पातळीत असावे लागतात. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकूच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो, त्यावेळी तो पूर्णपणे दिसेनासा होतो. याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. एका वर्षात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहण होतात. दर अमावश्येला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही, कारण चंद्राची भ्रमण पातळी आयनीक पातळीशी ५ अंशांचा कोन करते. त्यामुळे पौर्णिमेला किंवा अमावस्येला चंद्र आयनिक पातळीच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला असू शकतो. त्यामुळे सूर्य, चंद्र, पृथ्वी एका रेषेत येऊ शकत नाही.
सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी या विलोभनीय खगोलीय घटनेचे निरीक्षण करून त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रविण गुल्हाने, सचिव सुशीलदत्त बागडे व हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी केले आहे.