वॉशिंगटन , 10 जुलै (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. ट्रम्प सरकारने केलेल्या नासाच्या अर्थसंकल्पीय कपातीच्या पार्श्वभूमीवर नासा आपल्या 2,145 वरिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
कर्मचाऱ्यांना काढून टाकणे हे बजेटमध्ये कपात करण्याच्या आणि एजन्सीच्या कामाला अधिक प्राधान्य देण्याच्या योजनेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.नासाच्या या निर्णयाचा वैज्ञानिक रचनेवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे.अहवालानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे ते बहुतेक GS-13 ते GS-15 श्रेणीतील आहेत, ते अमेरिकन सरकारी सेवेतील वरिष्ठ पद मानले जाते. या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती, बायआउट (खाजगीरित्या निवृत्तीची ऑफर) किंवा राजीनाम्याच्या पर्यायांनी बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.
या कपातीत नासाचे अनुभवी वैज्ञानिक, अभियंते, वित्त व मानव संसाधन अधिकारी यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी ज्येष्ठ गटात मोडणारे, संघटनेच्या धोरणात्मक व वैज्ञानिक नेतृत्वात काम करणारे आहेत.यामुळे नासाच्या अनेक चालू व नियोजित मिशन्सवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
नासाच्या प्रवक्त्या बेथानी स्टीव्हन्स यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या मोहिमेसाठी वचनबद्ध आहोत, परंतु आता आम्हाला मर्यादित बजेटमध्ये प्राधान्य द्यावे लागेल.” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात नासा आणि अमेरिकेच्या अंतराळ धोरणात अनेक बदल झाले आहेत. याचा परिणाम नासाच्या १८ हजार कर्मचाऱ्यांच्या टीमवरही झाला आहे.