टोकीयो, 16 मे (हिं.स.)।जपानमध्ये येत्या जुलै महिन्यात महाभयंकर त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ३ लाख लोकांचा मृत्यू होऊन शकतो, असा इशारा जपान सरकारने दिला आहे.
सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात जपानच्या समुद्रात ९.० रिश्टर स्केल किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप होण्याचा धोका आहे. या भूकंपामुळे उठणाऱ्या त्सुनामीच्या लाटा किनारी भागात भीषण हानी करू शकतात.टोकोहोकू, शिझुओका, ओसाका आणि टोकियो या महत्त्वाच्या किनारी शहरांना उच्च धोका क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्वरित खबरदारी घेण्याचे आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी २०११ मध्ये जपानला अशाच एका विनाशकारी त्सुनामीचा सामना करावा लागला होता. त्या दुर्घटनेत १९,७५९ लोकांचा मृत्यू, तर हजारो लोक जखमी झाले होते. याशिवाय, दोन अणुऊर्जा प्रकल्पांमधून किरणोत्सर्गी गळती झाल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर, जपान सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि संभाव्य आपत्तीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती तयारी करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.