सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)।
कांदा बाजारासाठी संपूर्ण राज्यासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मागील सहा वर्षे या समितीच्या सभापतिपदाचा कारभार सांभाळलेले भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदा मात्र या निवडणुकीत न उतरण्याची भूमिका घेतली आहे. तर त्यांच्याच पक्षाचे असलेले सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी या दोन्ही आमदारांनी निवडणुकीत स्वतःचे पॅनेल उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने त्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतेही सक्रिय झाले आहेत. वार्षिक सुमारे १८०० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल करणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न समितीला मागील वर्षभरात वाढीव मुदतवाढ मिळाली होती. निवडणुकीच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी होऊन त्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.