वॉशिंग्टन , 22 मे (हिं.स.) – अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमधील ज्यू संग्रहालयाबाहेर भीषण गोळीबार झाला आहे. यामध्ये दोन इस्रायली अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. अटकेदरम्यान त्याने पॅलेस्टाईनच्या बाजूने घोषणा दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी इस्रायली दूतावासाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, गोळीबारात दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.
मीडिया रिपोर्टनुसार, वॉशिंग्टन डीसीमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला आहे. ही घटना बुधवारी(दि.२१) रात्री ९.१५ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्यात एक पुरूष आणि एक महिला ठार झाल्याचे वृत्त आहे. हल्ल्यात मारले गेलेले दोघेही इस्रायली राजदूत होते. वॉशिंग्टन पोलीस प्रमुख पामेला स्मिथ यांनी सांगितले की, “कार्यक्रमाच्या आधी म्युझियमबाहेर फेरफटका मारणाऱ्या एका संशयितला ताब्यात घेतले असून, त्याने पकडले जाताच “फ्री पॅलेस्टाईन, फ्री पॅलेस्टाईन” अशा घोषणा दिल्या.”
अमेरिकेच्या गृहसुरक्षा मंत्री क्रिस्टी नोएम, यांनी इस्रायली दूतावासाचे दोन कर्मचारी मृत झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली. “आपण सध्या सक्रिय आणि सखोल तपास करत आहोत आणि घटनेबाबत अधिक माहिती गोळा करत आहोत,” असे त्यांनी ‘एक्स’द्वारे लिहिले. “या क्रूर गुन्हेगाराला योग्य ते शासन देऊ,” असेही त्यांनी यात नमूद केले.
या घटनेप्रकरणी ‘एफबीआय’चे संचालक काश पटेल म्हणाले की, महानगर पोलिस विभागासोबत प्रतिसाद देण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी काम करत असताना, त्वरित, कृपया पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा,” असे त्यांनी एक्सवर लिहिले आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली. “या प्राणघातक गोळीबारात इस्रायली दूतावासाचे कर्मचारी जखमी झाले आहेत,” असे त्यांनी लिहिले. डॅनी डॅनन यांनी याला “यहूदी-विरोधी दहशतवादाचे घृणास्पद कृत्य” म्हटले. या प्रकरणावर अॅटर्नी जनरल पामेला बोंडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एक्सवर एक पोस्ट शेअर करून आपले दुःख व्यक्त केले आहे.
“वॉशिंग्टनमधील कॅपिटल ज्यू म्युझियमजवळ इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या, असे वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासाचे प्रवक्ते ताल नैम कोहेन यांनी एक्सवर लिहिले. आम्हाला स्थानिक आणि संघीय स्तरावरील कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे की ते संपूर्ण अमेरिकेतील इस्रायलच्या प्रतिनिधींचे आणि ज्यू समुदायांचे संरक्षण करतील.