फलटण , 30 जून (हिं.स.)।संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना दि. २९ जूनला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील बरडजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार रामेश्वर बावनकुळे (२२) व मधुकरराव तुकाराम शेंडे (५५) अशी त्या मृत झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम बरड (ता. फलटण) येथे होता. बरड जवळील टोलनाका येथे मुक्कामासाठी टेंट उभारताना तुषारने लोखंडी रॉडला हात लावल्यानंतर त्यांना शॉक बसला. तुषार रॉडला चिटकल्याने त्यांना बाजूला काढण्यासाठी पुढे आलेले मधुकरराव हेही तुषार यांना चिटकले तेव्हा दोघांना विजेचा शॉक बसला. त्यावेळी तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला कॉल केला. दोघांनाही उपचारासाठी दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी दोघेही उपचारापूर्वी मृत झाल्याचे घोषित केले.
मधुकर तुकारामजी शेंडे व तुषार रामेश्वर बावनकुळे हे दोघेही निस्सीम विठ्ठलभक्त होते. या घटनेमुळे त्यांच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली होती. शेंडे हे अविवाहित होते व त्यांनी संपूर्ण जीवन वारकरी सेवा व समाजसेवेला अर्पण केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते. विविध सामाजिक संघटनांशी ते जोडलेले होते.