सोलापूर, 3 ऑगस्ट – धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन महिलांना कांद्याने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी पावणे आठ वाजता दामाजी कारखाना रोडवरील बायपासजवळ घडली.
मृत महिलांची नावे रेणुका विजय तासगावकर (वय 40) आणि शालिनीताई पांडुरंग तासगावकर (वय 65) अशी असून त्या सासू-सुना आहेत. दोघी सकाळी साडेसात वाजता धर्मगाव रोडवरील घरातून दुचाकी (एमएच 13 पीएम 3084) वरून धार्मिक कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या.
धर्मगाव बायपास रोडवर पूर्वेकडे जात असताना पंढरपूरहून येणाऱ्या ट्रकने (केए 01 एई 6291) पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.