अमरावती, 11 एप्रिल (हिं.स.)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्यावतीने पश्चिम विदर्भातील निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सोमवारी (१५ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता अमरावती येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात होणार आहे.
या मेळाव्यात संघटनबांधणी, निवडणूक तयारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख, पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्यासह पश्चिम विदर्भातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अमरावती विभागासह अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यांतील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्णायक भूमिका बजावण्यासाठी ही बैठक दिशा ठरवणारी ठरणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, गटबाजीला दूर ठेवून एकसंघपणे निवडणुका लढवण्याचा निर्धार या बैठकीत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना ठाकरे गट सध्या राज्यभरात संघटनबांधणीच्या दृष्टीने सक्रिय आहे. प्रत्येक विभागात मेळावे घेतले जात आहेत. अमरावतीतील निर्धार मेळावाही याच रणनीतीचा एक भाग आहे. विदर्भातील ताकद दाखवण्याची संधी या निमित्ताने पक्षाला मिळणार आहे.मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. प्रचार साहित्य, कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि सभास्थळी नियोजनासाठी विविध समित्या कार्यरत आहेत. या बैठकीतून पक्षातील गतीमानता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.