मुंबई, १ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्राच्या
राजकारणात अनेक वर्षांनंतर ऐतिहासिक वळण लागले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर एकत्र दिसणार
आहेत. आगामी ५ जुलै रोजी वरळी डोम येथे सकाळी १० वाजता आयोजित “विजयी
मेळाव्या”च्या निमित्ताने हे दोन बंधू मराठी जनतेसमोर येणार आहेत. दोघांनीही
संयुक्त निवेदनाद्वारे मराठी बांधवांना मोठ्या जल्लोषात सहभागी होण्याचे आवाहन
केले आहे.
राज आणि उद्धव ठाकरे
यांचे हे ऐक्य विशेषतः हिंदी सक्तीविरोधातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडते आहे.
महायुती सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाने
याला “मराठी जनतेचा विजय” म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला.
संयुक्त पत्रकात राज आणि
उद्धव ठाकरे म्हणतात, “आवाज मराठीचा!
मराठी मातांनो, भगिनींनो आणि
बांधवांनो, सरकारला नमवलं का?
हो, नमवलं! कोणी नमवलंतर ते तुम्ही,
मराठी जनतेनेच! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष केला. त्यामुळे या विजयाचा आनंद
साजरा करण्याची वेळ आली आहे. आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजकआहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. ”
हे पत्रक मनसेच्या अधिकृत
एक्स हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात राज ठाकरे यांचे नाव उद्धव ठाकरे
यांच्या आधी नमूद करण्यात आले आहे – ही बाबही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
या ऐतिहासिक मेळाव्याची
तयारी जोमात सुरू असून मनसे व ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांच्या संयुक्त बैठकाही
सुरू आहेत. संजय राऊत, बाळा नांदगावकर,
नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अभिजित पानसे आणि वरुण सरदेसाई या नेत्यांकडून नियोजनाची आखणी सुरू आहे.
शिवसेना नेते संजय राऊत
यांनीही मराठी जनतेला साद घालत म्हटले आहे, “हा फक्त एक मेळावा नाही, तर महाराष्ट्राच्या शत्रूंना उत्तर देणारा जागर आहे. मराठी
अस्मितेचा उठाव आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने या जागराला यावे.”
राज आणि उद्धव ठाकरे
यांचे व्यासपीठावर एकत्र येणे हे केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे, तर भावनिक आणि सामाजिकदृष्ट्याही एक
महत्त्वपूर्ण क्षण मानला जात आहे. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे
महाराष्ट्रासाठी निर्णायक वळण ठरू शकते.