मुंबई, १६ जुलै: विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाचा समारोप झाला. यावेळी राजकीय वातावरण तापलेलं दिसून आलं. सभागृहात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खुला प्रस्ताव दिला, तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून अंबादास दानवे यांचं मनापासून कौतुक करत शिंदे गटावर निशाणा साधला.
ठाकरे म्हणाले, “तुमचं आमदारकीचं पहिलं टर्म संपलं आहे, पुन्हा येणार असल्याचं जाहीरपणे म्हणा – पण हेही सांगा की मी याच पक्षातून परत येणार आहे.” त्यांच्या वक्तव्यामुळे दानवे यांना शिंदे गट वा भाजपकडून ऑफर येण्याच्या चर्चा जोरात आहेत.
एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी दानवे यांच्यावर टिप्पणी करत “ते सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाहीत” असं म्हटलं होतं. यावर उत्तर देताना उद्धव म्हणाले, “हो, ते सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत, पण भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही. समोर काही चांगलं दिसतं म्हणून तिकडे गेले नाहीत.”
उद्धव ठाकरेंनी असेही सांगितले की, “अंबादास भाजपच्या व संघाच्या शाळेत तयार झालेले कार्यकर्ते आहेत, त्यांचं आमच्याकडे येणं हे आमचं भाग्य आहे. पण मुख्यमंत्री माझे आभार मानतील का, यात शंका आहे. त्यांनी माझ्याकडून नेते वेगळेच घेतले.”