सोलापूर, 20 ऑगस्ट – उजनी धरणात १०५.२५ टक्के जलसाठा झाल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. सायंकाळी सात वाजता धरणातून ७५ हजार क्युसेक तर वीजनिर्मितीसाठी १,६०० क्युसेक असा एकूण ७६ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि पुणे जिल्ह्यातील धरणांमधून सातत्याने पाणी येत असल्याने उजनी धरणाची पाणीपातळी वाढत आहे. सध्या दौंडहून एक लाख क्युसेक वेगाने पाणी उजनीत येत आहे. त्यामुळे धरण १०५ टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून, साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पूरनियंत्रणासाठी रात्री नऊपासून ७५ हजार क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील साहित्य आणि जनावरे तातडीने हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
जिल्हा प्रशासनाने सांगितले की, पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकीनुसार उजनी धरणातील विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो.