महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली काळजी तेहरान , 22 जून (हिं.स.)। इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका देखील थेट युद्धात उतरली असून, तिने इराणमधील तीन महत्वाच्या अणुस्थळांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या या कारवाईवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हणलं आहे की, “हा संघर्ष वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. याचे नागरिक, संपूर्ण प्रदेश आणि जगावर विनाशकारी परिणाम होऊ शकतात,” असा गंभीर इशारा गुटेरेस यांनी दिला आहे. गुटेरेस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या धोकादायक टप्प्यावर आपण अराजकतेचे चक्र टाळले पाहिजे.
या संपूर्ण संघर्षावर राजनैतिक मार्गाने तोडगा काढणे हीच काळाची गरज आहे.” दरम्यान, अमेरिकेच्या बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणु केंद्रांवर हल्ले चढवले. अमेरिकेची ही कारवाई इस्रायलच्या समर्थनार्थ झाल्याचे सांगितले जात आहे.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवरून या कारवाईची पुष्टी करत दावा केला आहे की, “इराणची तिन्ही अणुस्थळे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.”या कारवाईनंतर संपूर्ण जगाचे लक्ष आता पश्चिम आशियातील या संघर्षाकडे लागले आहे. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. —————