माढा : अधिकाऱ्यांचे गाव म्हणून राज्याला परिचित असलेल्या उपळाई बु ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या बोकडदरावाडी (ता. माढा) येथील डाॅ. अश्विनी तानाजी वाकडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त केले. त्या आयएएस बनल्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी कलेक्टर झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच अधिका-यांचे गाव अशी ओळखही अबाधित राहिली आहे.
आज जाहीर झालेल्या यूपीएससी निकालामध्ये डाॅ. अश्विनी या 200 व्या क्रमाकांनी यशस्वी झाल्या आहेत. माढा पोलीस स्टेशनमधून दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मुलगी तर कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे व लातूरच्या वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या त्या बहीण आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डाॅ. वाकडे यांचे प्राथमिक शिक्षण घेरडी (ता. सांगोला) येथे माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी काॅलेज, बार्शी येथे झाले आहे. यानंतर त्यांनी पुण्याच्या बी जे मेडिकल काॅलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन डाॅक्टर बनल्या. वैद्यकीय सेवा बजावत असतानाच त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला होता. याअगोदर दोन वेळा मुलाखतीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. मात्र अपयशाने खचून न आजच्या निकालामध्ये त्यांनी बाजी मारली.
“अपयशाने खचून न जाता जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. आपल्या आई वडिलासह भाऊ बहिणीचे स्वप्न पूर्ण केल्याचा मनोमन आनंद होत आहे” – डाॅ. अश्विनी तानाजी वाकडे, उपळाई