नवी दिल्ली,12सप्टेंबर : आगामी 15 सप्टेंबरपासून यूपीआयद्वारे आता 10 लाख रुपयांपर्यंतची खरेदी करता येणार आहे. भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशने (एनपीसीआय) व्यक्ती ते व्यापारी (पी-2-एम) प्रकारातील यूपीआय व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे.
व्यक्ती ते व्यापारी (पी2एम) व्यवहारांची मर्यादा आता 10 लाख रुपये प्रति व्यवहार झाली आहे.
यामुळे अशा क्षेत्रांना लाभ होईल जिथे मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून, किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यांसारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत होत्या.मात्र, व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा 1 लाख रुपये प्रति दिवस पूर्वीप्रमाणेच कायम आहे. इतर क्षेत्रांतील मर्यादा वाढवण्यात आल्या असून भांडवली बाजार व विमा क्षेत्रात गुंतवणूक मर्यादा प्रति व्यवहार मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तर एकूण दैनिक मर्यादा 10 लाख रुपये झाली आहे. ई-मार्केटप्लेसवरील शासकीय व्यवहार मर्यादा 1 लाखांवरून 5 लाख रुपये केली आहे.
प्रवास क्षेत्रात प्रति व्यवहार मर्यादा 5 लाख रुपये असून एकूण दैनिक मर्यादा: 10 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यूपीआयच्या माध्यमातून क्रेडिड कार्ड बिल भरणा आता प्रति दिवस 5 लाख रुपयांपर्यंत करता येणार आहे. तसेच सोने-चांदी/दागिने खरेदी आता 2 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करणे शक्य होईल. पूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये होती. तर मुदत ठेवी संदर्भातील व्यवहाराची मर्यादा 2 लाखांहून 5 लाख रुपये केली आहे.एनपीसीआयच्या मते, या सुधारित मर्यादांमुळे विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उच्च-मूल्य व्यवहारासाठी यूपीआय अधिक उपयुक्त ठरेल, व यामुळे भारतातील डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.