वॉशिंग्टन, 1 ऑगस्ट – अमेरिका पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानबाबत दुहेरी भूमिकेत दिसून आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (31 जुलै) 94 देशांच्या टॅरिफ आदेशावर स्वाक्षरी केली. हा आदेश 7 ऑगस्टपासून लागू होणार असून, भारतावर 25% कर, तर पाकिस्तानवर केवळ 19% कर लावण्यात आला आहे. दक्षिण आशियातील कोणत्याही देशावर असलेला हा सर्वात कमी कर पाकिस्तानसाठी लागू होणार आहे.
भारतावर टॅरिफ कायम, पाकिस्तानला सवलत
-
एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी भारतावर 26% आणि पाकिस्तानवर 29% कर लावण्याची चर्चा केली होती.
-
नवीन आदेशानुसार भारतावर 25% टॅरिफ कायम ठेवण्यात आले.
-
पाकिस्तानवरील टॅरिफ मात्र 29% वरून कमी करून 19% करण्यात आले.
-
शेजारील बांगलादेशवरचा करही 35% वरून 20% केला आहे.
पाकिस्तानला होणार फायदा
या निर्णयामुळे पाकिस्तानला कापड उद्योगात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अमेरिका हा पाकिस्तानच्या कापड निर्यातीसाठी सर्वात मोठा बाजार आहे. भारत, बांगलादेश आणि व्हिएतनाम देखील या क्षेत्रात स्पर्धेत आहेत, परंतु त्यांच्यावर जास्त शुल्क असल्याने पाकिस्तानला अधिक ऑर्डर्स मिळू शकतात.
पाकिस्तान सरकारने या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, यामुळे ऊर्जा, खनिजे, आयटी आणि क्रिप्टो क्षेत्रात आर्थिक सहकार्याचे नवे मार्ग खुलणार आहेत.
अमेरिकेसोबत पाकिस्तानचा नवा करार
ट्रम्प यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पाकिस्तानसोबत तेल व व्यापार कराराची घोषणा केली. त्याअंतर्गत अमेरिका पाकिस्तानला तेल काढणे आणि साठवणुकीत मदत करणार आहे. भविष्यात पाकिस्तान भारतालाही तेल विकू शकेल, असा दावा ट्रम्प यांनी केला.
भारत-अमेरिका संबंधात तणाव
गेल्या काही महिन्यांत अमेरिका-पाकिस्तान संबंध अधिक जवळ आले आहेत. पाकिस्तानने जून महिन्यात ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले होते. त्याचवेळी, भारतासोबतचे अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. आता भारतावरील टॅरिफ कायम ठेवून, पाकिस्तानला सवलत देणे हे त्याचं आणखी एक उदाहरण मानलं जात आहे.