वॉशिंग्टन, 28 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत युद्धासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानकडूनही हालचाली सुरु असून सीमेवर रणगाडे तैनात केले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला तोडगा काढण्याचे आवाहन करत भारताला पाठिंबा दर्शविला आहे.
भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने अमेरिकेने दोन्ही देशांनी जबाबदारपणे तोडगा काढण्यासाठी काम करावे, असे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, दोन्ही सरकारांच्या आम्ही संपर्कात आहोत. ही एक बदलणारी परिस्थिती आहे आणि आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. त्यांनी अमेरिकेने हल्ल्याचा निषेध केल्याचे सांगितले. तसेच अमेरिका भारतासोबत उभी आहे, या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिलेल्या पाठिंब्याचा पुनरूच्चार केला.
हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असून, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि शांततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात वांग यी यांनी पाकिस्तानच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या चीनच्या दीर्घकालीन भूमिकेची पुनरुच्चार केला. ते म्हणाले, चीनने नेहमीच पाकिस्तानच्या ठाम दहशतवादविरोधी कारवायांना पाठिंबा दिला आहे आणि पाकिस्तानच्या योग्य सुरक्षाविषयक चिंतेला पूर्णपणे समजून घेतले आहे.
भारताच्या कठोर उपाययोजनांमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने मित्र चीनसमोर मदतीसाठी रडत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान, भारताच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या आवाहनाला चीनने रविवारी(दि.२७) पाठिंबा दिला. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यातील फोनवरून निष्पक्ष चौकशीला पाठिंबा असल्याचे बीजिंगच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र पाकिस्तानने तपास पथकात चीन, रशिया किंवा पाश्चात्य देशांतील तज्ञांचा समावेश असावा, असे म्हटले आहे.
—————