वॉशिंगटन , 10 जून (हिं.स.)।ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी अमेरिकेत गेलेले पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी अमेरिकेच्या धोरणांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या घटनांमध्ये वाढ होण्यास अमेरिकेची धोरणे जबाबदार असल्याची टीका बिलावल भुट्टो यांनी केली आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी आपल्या निवेदनात २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या अफगाणिस्तानबाबतच्या निर्णयाकडे लक्ष वेधले. बिलावल म्हणाले की, अमेरिकेने ज्या पद्धतीने घाईघाईने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे, त्यामुळे अफगाणिस्तानात अनेक धोकादायक शस्त्रे राहिली. बिलावलचा दावा आहे की, ही शस्त्रे आता दहशतवादी गटांच्या हाती लागली असून, दहशतवादी ही शस्त्रे पाकिस्तानविरुद्ध वापरत आहेत.बिलावल भुट्टो यांचे हे विधान पुन्हा एकदा अमेरिका आणि पाकिस्तानमधील राजनैतिक तणाव वाढवू शकते. बिलावल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अमेरिका आणि त्या प्रदेशाची भू-राजकीय परिस्थिती पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान बनली आहे. दरम्यान, बिलावल भुट्टो आता दक्षिण आशियातील अमेरिकेच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
भुट्टोंनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर दिला. परंतु त्यांनी संपूर्ण प्रदेशात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानच्या भूमिकेचा मुद्दा उपस्थित केला नाही. इस्लामिक दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानची भूमिका बिलावल यांनी मान्यच केली नाही. यावरुनच पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येतो.दरम्यान, अफगाणिस्तानने बिलावलच्या विधानावर अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी, अफगाणिस्तानने भूतकाळात इस्लामाबादच्या चिथावणीखोर विधानांविरुद्ध इशारा नक्कीच दिला आहे. यामुळे आधीच कमकुवत असलेल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते.
प्रदीर्घ संघर्षानंतर अमेरिकेने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेची ही संपूर्ण प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानने काबूलवर ताबा मिळवला, ज्यामुळे अफगाण सरकार कोसळले होते.
माघारी दरम्यान, अमेरिकेने २० वर्षांत अफगाण सैन्याला दिलेल्या ८९ अब्ज डॉलर्स किमतीच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग तिथेच सोडून दिला. यानंतर तालिबानने अफगाण सैन्याकडून सुमारे ६,५०,००० शस्त्रे हस्तगत केली, ज्यात ३,५०,००० M4/M16 रायफल, ६५,००० मशीन गन आणि २५,००० ग्रेनेड लॉन्चरचा समावेश होता. यामुळे संपूर्ण प्रदेशात अजूनही अस्थिरता आहे.