बीजिंग, ७ ऑगस्ट –
अमेरिकेने भारतावर लावलेल्या २५ टक्क्यांच्या अतिरिक्त आयात शुल्काची (टॅरिफ) जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली असून चीनच्या माध्यमांनीही या निर्णयावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे ही टॅरिफ लावली असून यामुळे काही भारतीय वस्तूंवरील एकूण शुल्क ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
चीनी माध्यमांनी म्हटले आहे की, हे फक्त कच्च्या तेलाच्या खरेदीचा प्रश्न नसून एका ‘आज्ञाधारक मित्राच्या’ बंडखोरीची गोष्ट आहे. अमेरिकेचे धोरण भारताच्या तटस्थतेला आणि राजनैतिक स्वातंत्र्याला विश्वासघात मानते, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे.
अमेरिका आणि युरोप स्वतः रशियाकडून मोठ्या प्रमाणात आयात करत असतानाही भारतावर टीका करतात, हे चीनच्या माध्यमांनी दाखवून दिले. अलीकडेच ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “अद्भुत मित्र” म्हणून स्वागत केले होते, आणि त्यानंतर काही महिन्यांतच टॅरिफ लावून व्यापारी संबंधांमध्ये दरी निर्माण केली गेल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताच्या अनिच्छेमुळे व्यापार करार रखडल्याचा दावा करत अमेरिकेने भारतावर दबाव आणण्यासाठी रशियाशी असलेल्या ऊर्जा संबंधांचा वापर सुरू केला आहे. रशियावर थेट आर्थिक दबाव टाकण्यात मर्यादा असल्याने भारतावरच कारवाई करत अमेरिका दोन उद्दिष्ट साध्य करू पाहत आहे – रशियाला रोखणे आणि भारताला दंडात्मक कारवाईने नमवणे, असे चीनच्या माध्यमांचे म्हणणे आहे.
भारताने या टॅरिफला ‘अन्यायकारक, अनुचित व अवाजवी’ म्हटले असून परराष्ट्र मंत्रालयाने देशाच्या हितासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. तेल आयात ही बाजाराच्या गरजेनुसार आणि १४० कोटी भारतीयांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकन टॅरिफमुळे कापड, रेडिमेड कपडे, रत्ने-आभूषणे, इंजिनिअरिंग उत्पादने, ऑटो पार्ट्स, मसाले व कृषी मालाच्या निर्यातीवर विपरित परिणाम होऊ शकतो. परिणामी लाखो नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.