यवतमाळ, 23 मे (हिं.स.)।
समाजात आजही मोठ्या प्रमाणात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. तंबाखू, तंबाखूयुक्त पान, सुपारीसारख्या वस्तुंमध्ये जीवघेण्या पदार्थांचा वापर करण्यात येतो. वयस्कांकडून होणाऱ्या अशा सेवनाचे अनुकरण समाजातील बाल मनावर सुद्धा होतांना दिसत आहे. त्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन समुळपणे नष्ट होणे आवश्यक आहे.
भारताचा विचार केला तर, असे दिसून येते की, तंबाखू हे उत्पादन भारताचे नसून सुद्धा सद्याच्या परिस्थितीत भारताने तंबाखू उत्पादनामध्ये आणि सेवनामध्ये उच्चांक गाठला आहे. आज अल्पवयीन मुलांपर्यंत मोठ्या प्रमाणावर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचा वापर होत आहे. याच्या सततच्या सेवनामुळे कर्करोग हा एक असंसर्गजन्य आजार होतो. या आजारचा प्रसार एका व्यक्तिपासून दुसऱ्या व्यक्तिस होत नाही म्हणून या आजारास असांसर्गिक म्हणतात. कर्करोगामध्ये पेशींची असामान्य वाढ होणे, असामान्य बाधा झालेल्या पेशींची आजूबाजूच्या सामान्य पेशी अवयवामध्ये पसरण्याची क्षमता असते. वेळीच सावधानता बाळगून उपचार केला गेला नाही तर त्यामुळे रुग्णाचा मृत्यु सुद्धा होतो.
भारतात दरवर्षी 60 लक्ष लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यु पडतात आणि हे सेवनाचे प्रणाम सतत असेच चालू राहिले तर, हे प्रमाण 2030 पर्यंत 80 लक्ष लोक तंबाखूच्या सेवनामुळे मरण पावतील, असे भाकीत समोर मांडण्यात आले आहे. प्रतेक सेकंदाला 5 नवीन अल्पवयीन तंबाखूच्या नवीन सेवनाला बळी पडतात. तर, दर 15 मिनिटाला 27 ते 30 लोक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे मरण पावतात.
तंबाखूमध्ये सर्वसामान्याला माहिती असणाऱ्या निकोटीन व्यतिरिक्त चार हजार प्रकारचे विषारी केमिकल असतात. हे केमिकल मानवी शरीराला अत्यंत घातक असतात. या सर्व पदार्थांपासून कर्करोगाव्यतिरिक्त बरेचशे आजार होतात, जसे की अंगावर सुरकुत्या पडणे, मोतियाबिंदू, गॅगरिन, किडनी खराब होणे, कर्करोगासारखे अनेक मोठ-मोठे आजार होतात, म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखा पर्यंत सर्वच अवयवाला तंबाखू पदार्थ घातक आहे.
तंबाखूच्या सेवनामुळे आर्थिक नुकसाणीचा विचार केला तर असे दिसून येते की, ज्यावेळी व्यक्ती यासारख्या मोठ्या रोगाच्या विळख्यात पडतो तेव्हा आजाराला लागणारा खर्च वेगळाच असतो. सोबतच त्यांचा लागणारा खर्च वेगळाच दिसून येतो. या सर्व गोष्टीचा विचार करता तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ किती प्रमाणात घातक आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे समाज आणि देश घडवायचा असेल तर तरुणांच्या भविष्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ टाळणे काळाची गरज आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी कळविले आहे.
