सोलापूर, 7 जून (हिं.स.)।
पंढरपूर येथील आषाढी वारीनिमित्त लाखो भाविकांची गर्दी पंढरीत होत असते. या गर्दीच्या नियंत्रणासाठी ड्रोन, एआयचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून दीड कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.आषाढी वारीला कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणातून लाखो वारकरी पायी येतात. ही संख्या 10 लाखांहून अधिक असते. गर्दीच्या नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञान आणि ड्रोनचा वापर पोलिस विभागाकडून केला जाणार आहे.
मागील काही वर्षांपासून दिंड्यांचे प्रमाण वाढत आहे. दर तीन ते चार किलोमीटर अंतरावर वारकर्यांच्यासाठी विसावा उपलब्ध करून दिला जाणार आहे. या विसाव्याच्या ठिकाणी बेड, पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचार अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. वारीमार्गातील अतिक्रमण हटविले जात आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याने मुरुमीकरण केले जाणार आहे.आषाढी वारीनिमित्त चंद्रभागेत भाविक स्नान करतात. सध्या पंढरपूर येथील नदीत पाणी उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार 18 जूनला उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. ते पाणी 25 जूनपर्यंत चंद्रभागा नदीत पोहोचेल, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.