छत्रपती संभाजीनगर, 26 जुलै – माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड तुरुंगात असूनही अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “तीन महिन्यांपूर्वी माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून कराड यांचा थेट फोन आला होता.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड सध्या कोठडीत आहेत. याच पार्श्वभूमीवर दानवे म्हणाले, “वाल्मिक कराड तुरुंगातूनच सर्व कामकाज पाहतो आहे. त्याला कोणाचे संरक्षण आहे याची चौकशी झाली पाहिजे.” त्यांनी कृषी विभागातील कथित घोटाळ्यांकडेही लक्ष वेधले. “उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली असली तरी नैतिकदृष्ट्या घोटाळा झाल्याचं स्पष्ट आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करत, “या योजनेतही मोठे घोटाळे झाले असून, सखोल चौकशी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
जेलमधील व्हीआयपी ट्रीटमेंटवर टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या टोळीतील सदस्य सध्या तुरुंगात आहेत. मात्र त्याला तुरुंगात ‘व्हीआयपी वागणूक’ दिली जात असल्याच्या आरोपांमुळे राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे.
शिरसाट–मिसाळ वादावर भाष्य
सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील वादावर दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “काम जनतेचे असेल, तर कोणताही मंत्री बैठक घेऊ शकतो. मात्र दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणे ही चूक आहे. समोरासमोर चर्चा झाली असती, तर वाद उभाच राहिला नसता.”
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “लोकशाहीची सिस्टीम आहे, ती मान्य करावी लागेल. कॅबिनेट मंत्र्यांना वाटते की अधिकार फक्त त्यांच्या हातात राहावेत, पण यंत्रणा सामूहिक निर्णयावर चालते.”
