सीआयआयच्या ‘इंडिया@100’ परिषदेत आवाहन
नागपुरात सीआयआयचे नवे विभागीय कार्यालय सुरू
नागपूर – “विदर्भाचे भविष्य हरित उद्योग, एकात्मिक लॉजिस्टिक्स आणि कृषी-आधारित मूल्यसाखळीत आहे. नागपूर हे मॉडेल सिटी बनले पाहिजे,” असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी नागपुरात त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने “इंडिया@100: चार्टिंग विदर्भाज जर्नी टू डेवलप्ड इंडिया” या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली.
गडकरी म्हणाले की, विदर्भाच्या औद्योगिक रूपांतरणासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि नागरी समाज यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. नागपूरकडे उत्तम पायाभूत सुविधा असून लघुउद्योगांना येथे मोठी संधी आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश
कार्यक्रमाला पाठवलेल्या संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या कार्यालयाचे अभिनंदन करताना म्हटले की, “नागपूर हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या संगमावर असल्याने या कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा समावेशक विकास साधला जाईल.”
उद्योगजगताचा प्रतिसाद
सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष ऋषी कुमार बागला यांनी सांगितले की, हे कार्यालय हे फक्त प्रतीकात्मक पाऊल नसून विदर्भातील धोरणात्मक संवाद, नवोन्मेष आणि उद्योग विकासासाठी एक कार्यरत व्यासपीठ ठरेल. त्यांनी गडचिरोलीतील प्रस्तावित मेगा स्टील प्रकल्पाचे कौतुक करत त्याला “परिवर्तनकारी प्रकल्प” म्हटले.
समन्वित विकासाची गरज
सीआयआय विदर्भ झोनल कौन्सिलचे अध्यक्ष जामदार यांनी समावेशक आर्थिक वाढीचे महत्त्व अधोरेखित केले आणि सीआयआय स्थानिक क्षमतांचा योग्य वापर करून विकासातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे सांगितले.
शैक्षणिक सहकार्यावर भर
सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी नागपूरमधून जागतिक दर्जाचे उद्योग उभे राहू शकतात, असे मत व्यक्त केले. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भिमाराय मेत्री यांनी उद्योग-शिक्षण भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करत, “विदर्भासाठी सशक्त नेतृत्व आणि नवोपक्रमाची गरज आहे, आणि त्यासाठी सीआयआयची उपस्थिती निर्णायक ठरेल,” असे सांगितले.