लंडन, 4 जुलै (हिं.स.)।भारतात कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप असलेला फरार विजय मल्ल्या आणि ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय मल्ल्या आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पार्टी लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यात जगभरातून फक्त निवडक लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी खेळाडू ख्रिस गेल देखील या पार्टीत सामील होता.
ललित मोदीने एक पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ललित मोदी आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्या ‘आय डिड इट माय वे’ गाणे गाताना दिसतात. या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘310 मित्र आणि कुटुंबासह एक उत्तम रात्र…हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालणार, वादग्रस्तही ठरणार, परंतु मी हेच सर्वोत्तम करतो.’
आरसीबीचा माजी स्टार ख्रिस गेलनेही मल्ल्या आणि मोदी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेलने मल्ल्या आणि ललित मोदींसोबतचा फोटो पोस्ट करताना लिहिले की, “आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. एका अद्भुत संध्याकाळसाठी धन्यवाद.” या पोस्टमुळे हजारो कोटी रुपये घेऊन भारतातून पळून गेलेले हे लोक परदेशात कसे विलासी जीवन जगतात, हे दिसून येते.
विजय मल्ल्या 2016 मध्ये यूकेला पळून गेला होता, तेव्हापासून तो तिथेच राहत आहे. भारत सरकारने मल्ल्याला 2019 मध्ये फरार घोषित केले होते. त्याच्यावर 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याने अलीकडेच पॉडकास्टमध्ये या आरोपांवर पहिल्यांदाच आपले मौन सोडले. त्याने म्हटले होते की, बँकांनी त्याच्याकडून सुमारे 14 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत.
ललित मोदींवर शेकडो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. हे प्रकरण 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलशी संबंधित आहे. त्या काळात ईडीने ललित मोदीवर आयपीएल स्थलांतरित करण्यासाठी पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. ज्यासाठी ईडीने ललितवर 10.65 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यासोबतच, त्याच्यावर फेमाचे उल्लंघन केल्याचाही आरोप होता.