अहिल्यानगर 2 एप्रिल (हिं.स.) :- वाकोडी (तालुका नगर) मध्ये सन 2019 मध्ये झालेल्या विजय पवार खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदारांच्या उलट तपास व जबाबातील विरोधाभास लक्षात घेऊन न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
सोनू पवार यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये 23 फेब्रुवारी 2019 रोजी मुख्य आरोपी जिगर कांबळे व लखन कांबळे तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांवर विजय पवार यांचा तलवार, कटावणी तसेच लाकडी दांडके मारून खून केला, या आशयाची फिर्याद नोंदविण्यात आली होती. तसेच यातील मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदारा अविनाश पवार याला देखील आरोपींनी जबर मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, असेही आरोप फिर्यादीत सोनू पवार यांनी केले होते. सोनू पवार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अविनाश पवार हे मयत विजय पवार यांचे सख्खे भाऊ होते.
पोलिसांनी केलेल्या तपासावरून फिर्यादी तसेच अविनाश पवार यांच्या सांगण्यावरून आरोपींनी विजय पवार यांना त्यांच्या घराजवळून 22 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान वाकोडी गावातील समाज मंदिरासमोर नेले होते. तेथेच त्याचा खून केला, अविनाश पवार याला सुद्धा जबर मारहाणी केली. असे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर विजय पवार यांचे जिल्हा रुग्णालय येथे पोस्टमार्टम करण्यात आले. त्याच्या शरीरावर 24 जखमा डॉक्टरांना आढळून आल्या. त्यानंतर तपासी अधिकारी यांनी घटनेचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार आरोपीविरुद्ध सत्र न्यायाधीश लोणे यांच्यासमोर खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.
आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी सरकारी पक्षाने 14 साक्षीदारांच्या साक्ष कोर्टासमोर नोंदवल्या. आरोपींच्या वतीने ॲड. परिमल फळे यांनी युक्तीवाद करुन त्यांची बाजू कोर्टासमोर मांडली. अविनाश पवार, फिर्यादी सोनू पवार व पोस्टमार्टम केलेल्या डॉक्टरांचा घेतलेला उलट तपास यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरला. ॲड. परिमल फळे यांनी सदर आरोपींनी विजय पवार याचा खून केलेला नसून, अविनाश पवार यांनीही कुठलीही घटना पाहिली नाही असा युक्तिवाद केला. साक्षीदारांचा झालेला उलट तपास तसेच न्यायालयासमोर झालेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या जबाबदातील विरोधाभास यावरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.सदर खटल्या कामी ॲड. परिमल फुळे यांना ॲड. आनंद कुलकर्णी व ॲड. निखिल मुसळे यांनी सहाय्य केले.