भाजप आमदार सुमित वानखेडे यांचा गंभीर आरोप
नागपूर, 13 जुलै (हिं.स.) : वर्धा जिल्ह्यातील विविध गांधीवादी संस्थांमध्ये नक्षलवाद्यांनी घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी केला आहे. वर्धेतील अनेक संस्थांमध्ये सेमिनार, बैठक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून माओवादी विचारसरणीचा प्रचार केला जात आहे.
याबाबत आमदार वानखेडे म्हणाले की, भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष मदत केली. त्याच मदतीची परतफेड म्हणून आता महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला जात आहे. राज्यातील शहरी माओवादी फ्रंटल ऑर्गनायझेशनवर कारवाई करण्यासाठी हे विधेयक अत्यावश्यक असल्याचे आ. वानखेडे म्हणाले.
गांधीवादी संस्थांवर नक्षलवाद्यांचे वर्चस्व
आमदार वानखेडे यांच्या मते, वर्धेतील अनेक गांधीवादी आणि सामाजिक संस्था आता शहरी नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली आहेत. गांधींनी देशाला अहिंसेच्या तत्त्वावर स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. परंतु नक्षलवादी बंदुकीच्या नळीतून क्रांती घडवू पाहतात. त्यांना 2047 पर्यंत भारतात चीनसारखी सशस्त्र सत्ता घडवायची असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
संविधानाच्या नावाखाली संभ्रमाचे वातावरण
वानखेडे यांनी आरोप केला की नक्षलवादी विचारसरणीचे लोक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सक्रिय होते. त्यांनी तरुण, वकील, महिला यांच्यात कार्यरत असलेल्या विविध फ्रंटल संघटनांच्या मदतीने निवडणुकीत प्रचार केला आणि “संविधान धोक्यात आहे” असा खोटा नरेटिव्ह निर्माण केल्याचे आमदार वानखेडेंनी सांगितले.
सामाजिक विभाजन आणि असंतोषाचा डाव
“दलित, आदिवासी, बेरोजगार तरुण आणि गरीब शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कटकारस्थान थांबवण्यासाठी कायदा आवश्यक आहे,” असे वानखेडे यांनी ठामपणे सांगितले. तसेच, आज भाजप सत्तेत असला तरी उद्या सत्तांतर झाले, तरी हे माओवादी कुणालाही नुकसान पोहोचवू शकतात, असा इशाराही वानखेडे यांनी दिला.
खऱ्या गांधीवाद्यांनी सावध राहावे – वानखेडे
नक्षलवाद्यांची गांधीवादी संस्थांमध्ये घुसखोरी झालेली असून, त्यातून देशाच्या ऐक्याला आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खऱ्या गांधीवाद्यांनी आता सावध व्हायला हवे असा सल्ला वानखेडेंनी दिला. राज्य व केंद्र सरकार वर्ध्यातील परिस्थितीकडे गंभीरतेने पाहत असून, कायदा पारित झाल्यामुळे लवकरच योग्य ती कारवाई होईल, असा विश्वास वानखेडे यांनी व्यक्त केला. ————————