पुणे, 4 एप्रिल, (हिं.स.)। खडकवासला पाटबंधारे विभागाला या वर्षी पाणीपट्टीमधून 422 कोटी 45 रुपये मिळाले आहेत. मागील वर्षी (2024-25) 338 कोटी रुपये पाणीपट्टी वसूल झाली होती. मागील वर्षापेक्षा सुमारे 85 कोटी रुपयांनी पाणीपट्टी अधिक आहे. सिंचनापेक्षा (शेतीला पाणी) बिगर सिंचनामधून अधिक पाणीपट्टी वसुली झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
खडकवासलासाखळी प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहरासह जिल्ह्यातील हवेली, दौंड, बारामती (काही भाग) तसेच इंदापूर तालुक्यातील शेती तसेच नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. याबरोबरच औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, पाणी वापर संस्था यांना देखील पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून पुणे शहराची लोकसंख्या वाढल्याने सर्वात अधिक पाणी नागरिकांना पिण्यासाठी द्यावे लागत आहे. त्यामुळे सिंचना (शेतीला पाणी) पेक्षा बिगर सिंचनाला जास्त पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बिगर सिंचनामधून जास्त पाणीपट्टी वसूल झाली आहे.
साखळी प्रकल्पात 2024-25 या सालात एकूण 422 कोटी 45 लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली आहे. ही पाणीपट्टी मागील पाच वर्षांत सर्वात अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. गेल्या पाच वर्षांत कोरोनाचा कालावधी वगळल्यास इतर वर्षी पाणीपट्टीच्या माध्यमातून चांगलीच पाणीपट्टी वसूल झाली आहे