मुंबई, २६ मे (हिं.स.) : मुंबईत सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, त्याचा मोठा फटका मेट्रो सेवेलाही बसला आहे. नव्याने सुरू झालेल्या मेट्रो ३ मार्गावरील वरळी येथील आचार्य अत्रे भुयारी मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी शिरले. पायऱ्यांवरून धबधब्यासारखे पाणी खाली जात असल्याचे दृश्य आज पाहायला मिळाले.
परिणामी, स्थानकात चिखल आणि कचरा साचून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
या पाण्यामुळे मेट्रोचे दरवाजे काही वेळ बंद ठेवण्यात आले आणि प्रवाशांना स्टेशनवर उतरता आले नाही. सुमारे २० मिनिटे मेट्रो तिथेच थांबली होती. स्वयंचलित जिनेही बंद झाले होते, तर जिन्याच्या पायऱ्या पाण्यात बुडाल्या होत्या.
या घटनेमुळे मेट्रो स्थानकांची जलनियोजन व्यवस्था आणि प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरळी परिसरात सुरू असलेल्या कामांमुळेही पाणी शिरल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
—————
