अमरावती, 10 जून (हिं.स.)।शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या विश्रोळी येथील जलाशयात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
बच्चू कडू यांनी गुरूकूंज मोझरी येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जलाशयात उड्या घेतल्या, असे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रहारचे पंधरा ते वीस कार्यकर्ते पूर्णा धरणाच्या जलाशयात घोषणा देत उभे आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ, शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेतीकामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा. हे शक्य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी १० हजार रुपयांची मदत देण्यात यावी. रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खतालादेखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी, दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीसाठी ६० रुपये प्रतिलिटर असा दर निश्चित करावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता ४० रुपये दर होईस्तोवर निर्यात बंदी लागू करू नये, अशा मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
अनेक गटांचे मिळताहेत जाहीर पाठिंबे
शिवसेना ठाकरे गटाने बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांनी गुरूकूंज मोझरी येथे पोहचून उपोषणस्थळी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी हेही होते. आंदोलनाच्या प्रत्येक पायरीवर बच्चू कडू यांची साथ देण्याचा निर्णय गजानन लवटे यांनी जाहीर केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याचे संकेत गजानन लवटे यांनी दिले.तर माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी हि बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला त्यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी हि आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन बाप्पू देशमुख हे उद्याला गुरुकुंज मोझरी मध्ये दाखल होणार आहेत. माजी मंत्री आ. विश्व्जीत कदम यांनीही आपला पाठींबा बच्चू कडू यांना दिला आहे. तर धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दिला आहे.धाराशिव विधान सभा मतदार संघाचे आ. कैलास पाटील यांनीही बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.
खोळंबलेला पगार एका क्षणात बँकेत जमा
जनार्दन परसराम राऊत, वनी तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती
यांनी आज जलसमाधी आंदोलनात सहभाग घेताच जलसमाधीस्थानिक प्रशासनाने त्यांच्या मागील सहा महिन्याचा खोळंबलेला पगार एका क्षणात बँकेत जमा केला,बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या यशस्वीतीला सुरुवात झाली असल्याची चर्चा यावेळी परिसरात जोर धरू लागली आहे.